Champions Trophy Ads Rate:चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून भारतानं अंतिम फेरी गाठल्यानं उत्साहही शिगेला पोहोचला आहे. ९ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयाची प्रतीक्षा असली तरी अंतिम सामन्यापूर्वी कंपन्यांनी नक्कीच बाजी मारली आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी जाहिरातींच्या किमती गगनाला भिडत आहेत. डिजिटल आणि टीव्हीसारख्या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींचे दर जवळपास दुप्पट झालं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या जाहिरातीचे दर १० सेकंदांच्या स्लॉटसाठी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. डिजिटल दर ७२५ रुपये सीपीएम (प्रति हजार इम्प्रेशनसाठी किंमत) पर्यंत देखील असू शकतात. कोणतेही विशिष्ट लक्ष्य किंवा निकष नसताना वेबसाइटच्या विविध पानांवर झळकणाऱ्या रन ऑफ साइट (आरओएस) जाहिरातींचे दरही अंतिम सामन्यासाठी ५७५ रुपयांवर गेले आहेत. तर भारताच्या सामन्यांदरम्यान १० सेकंदांच्या व्हिडिओ जाहिरातींसाठी हा दर ५०० रुपये होता.
भारताच्या एन्ट्रीनं दर वाढला
एनव्ही कॅपिटलचे मॅनेजिंग पार्टनर विवेक मेनन यांच्या म्हणण्यानुसार आठ वर्षांनंतर पुनरागमन करणारी ही स्पर्धा एखाद्या मिनी वर्ल्ड कपसारखी आहे. भारत अंतिम फेरीत पोहोचल्यानं प्रेक्षक संख्येत मोठी वाढ होणार असून, उर्वरित सामन्यांसाठी जाहिरातींसाठी प्रीमियम दर आले आहेत. भारत अंतिम फेरीत पोहोचल्यानं जाहिरातींचे दर गगनाला भिडले आहेत. भारतीय सामन्यांसाठी १० सेकंदाच्या स्लॉटसाठी २० ते २५ लाख रुपये आणि कनेक्टेड टीव्हीसाठी १० ते १५ लाख रुपये जाहिरात दर होते.
भारत पाक दरम्यान सर्वाधिक
मेनन यांच्या म्हणण्यानुसार, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान जाहिरातीचा दर १० सेकंदासाठी ५० लाख रुपयांपर्यंत पोहोचला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर भारतीय सामन्यांसाठी जाहिरातींचे दर प्रति सीपीएम ५०० रुपये होते. बिगर भारतीय सामन्यांसाठी हे दर २५० रुपये झाले. मीडिया केअर ब्रँड सोल्युशन्सचे संचालक यासीन हमीदानी यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या सामन्यांदरम्यान १० सेकंदाच्या स्लॉटसाठी कनेक्टेड टीव्हीचा (सीटीव्ही) दर १५ लाख रुपये होता.
किती पैसा कमावण्याचा अंदाज?
या स्पर्धेमुळे एकूण १,५०० कोटी रुपयांचे जाहिरात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचा अंदाज व्हाईट रिव्हर्स मीडियाचे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स अँड ग्रोथचे प्रमुख रॉबिन थॉमस यांनी व्यक्त केला. सामन्याच्या अनुकूल वेळादेखील प्रेक्षक संख्या आणि जाहिरातदारांची आवड वाढविण्यात भूमिका बजावत असल्याचं इलारा कॅपिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष करण तौरानी म्हणाले. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) विश्लेषणानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये ११० कोटी टीव्ही प्रेक्षकांची नोंद झाली. भारत-पाकिस्तान सामन्याला ६०.२ कोटी व्ह्यूज मिळाले.