Join us

Budget 2025 : बजेटपूर्वी टाटा समूहाच्या 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी, पाहा काय घोषणा होऊ शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:46 IST

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी शेअर बाजारात मात्र उत्साह दिसून येतोय.

Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार दिसून आले. शुक्रवारीही शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी शेअर बाजारात मात्र उत्साह दिसून येतोय.

दरम्यान, शुक्रवारी सकारात्मक सुरुवात झाल्यानंतर बाजारात सातत्यानं तेजी दिसून येत आहे. अर्थसंकल्पापूर्वी काही शेअर्समध्ये वाढ दिसून येत असून, त्यात टाटा समूहातील काही बड्या शेअर्सचा समावेश आहे. आज जेव्हा बाजार उघडला तेव्हा निफ्टी ५० च्या टॉप ५ गेनरपैकी ३ टाटा ग्रुपचे होते.

टाटाच्या शेअरमध्ये तेजी

टाटा कन्झ्युमर, ट्रेंट, टायटन कंपनी आणि टाटा स्टील या शेअर्समध्ये आज सुरुवातीपासूनच तेजी दिसून येत होती. ट्रेंटमध्ये ६ टक्के वाढ दिसून आली. तर टाटा कन्झ्युमरमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली. टायटन कंपनीच्या शेअरमध्येही आज ४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या अर्थसंकल्पात तेजी दिसून आली होती आणि हा शेअर ७ टक्क्यांनी वधारला होता.

सणासुदीची मागणी, सोन्याचे चढे दर आणि लग्नसराईच्या हंगामातील खरेदी यामुळे दागिन्यांच्या सेगमेंटमध्ये वार्षिक २५ टक्क्यांनी वाढ झाल्यानं टायटननं आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे दमदार निकाल जाहीर केले.

यापूर्वी सरकारनं दिलेला दिलासा

गेल्या अर्थसंकल्पात टायटन कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ होण्याचे कारण म्हणजे सोने आणि चांदीवरील बेसिक कस्टम ड्युटी ६ टक्के आणि प्लॅटिनमवरील बेसिक कस्टम ड्युटी ६.४ टक्के करण्यात आली होती. सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील बेसिक कस्टम ड्युटी कमी करण्याची जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

अर्थसंकल्पापूर्वी टाटा कन्झ्युमरच्या शेअरच्या किमतीतही वाढ होत आहे. एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख शेअर्सनं अनेक दिवसांनंतर तेजी घेतली आहे. एफएमसीजी कंपन्या ग्रामीण वापरातील मंदीचा सामना करत आहेत. कमी वापरामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झालाय. ग्रामीण उत्पन्नासंदर्भात सरकार अर्थसंकल्पात काही घोषणा करू शकते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजारनिर्मला सीतारामन