नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करत मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. यापुढे १२ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही कर लागणार नाही. याआधी १२ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ७१,५०० रुपये कर द्यावा लागत होता. आता नव्या टॅक्स स्लॅबनुसार तुमच्या सॅलरीवर किती कर द्यावा लागणार, त्याचा किती फायदा होणार हे जाणून घेऊया.
जर तुमचा वार्षिक पगार १२ लाखापर्यंत असेल तर आता कुठलाही कर द्यावा लागणार नाही. तुमचं उत्पन्न १३ लाख असेल तर त्यावर ८८४०० रुपये कर भरावा लागत होता आता कर प्रणालीत बदल झाल्यानंतर १३ लाख उत्पन्नावर ६६३०० रुपये कर भरावा लागणार आहे म्हणजे जवळपास २२१०० रुपये फायदा होणार आहे.
याआधी १५ लाख कमाई करणाऱ्यांना १.३० लाख रुपये कर द्यावा लागत होता, नव्या स्लॅबनुसार आता ९७५०० रुपये कर द्यावा लागेल म्हणजे त्यांचा ३२५०० रुपये फायदा होईल. १७ लाख कमाई करणाऱ्यांना याआधी १,८४,००० कर द्यावा लागायचा आणि आता १.३० लाख कर भरावा लागणार आहे. ज्यामुळे या उत्पन्न गटातील लोकांना ५४६०० रुपये फायदा होणार आहे.
कमाई | सध्याचा कर | नवीन कर | फायदा/नुकसान |
१२ लाख | ७१५०० | ० | ७१५०० |
१३ लाख | ८८४०० | ६६३०० | २२१०० |
१५ लाख | १,३०,००० | ९७५०० | ३२५०० |
१७ लाख | १,८४,६०० | १,३०,००० | ५४६०० |
२२ लाख | ३,४०,६०० | २,४०,५०० | १,००,१०० |
२५ लाख | ४,३४,२०० | ३,१९,८०० | १,१४,४०० |
जर तुमचं उत्पन्न २२ लाख रुपये असेल तर त्यावर ३,४०,६०० रुपये कर द्यावा लागत होता परंतु आता २,४०,५०० रुपये टॅक्स भरावा लागेल, याचा अर्थ तुमचे १ लाख रुपये बचत होणार आहे. २५ लाख वार्षिक कमाई असणाऱ्यांना याआधी ४, ३४, २०० रुपये कर भरावा लागत होता परंतु आजच्या घोषणेनंतर या श्रेणीतील लोकांना ३ लाख १९ हजार ८०० रुपये भरावे लागतील. ज्यामुळे १ लाख १७ हजार ४०० रुपयांची बचत होईल.
पुढील आठवड्यात येणार नवीन आयकर विधेयक
केंद्र सरकार पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणणार आहे. ज्यात कर प्रणालीला सुलभ आणि पारदर्शक बनवले जाईल. त्याशिवाय इन्शुरन्स क्षेत्रात एफडीआय मर्यादा वाढवली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींच्या उत्पन्नावर टीडीएस मर्यादा ५० हजारावरून १ लाख इतकी करण्यात आली आहे.