कोरोनाच्या विश्वरूपी साथीने आरोग्यसेवांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाल्याने आगामी अर्थसंकल्पामध्ये मोठी आर्थिक तरतूद प्राथमिक आरोग्यसेवा व आरोग्याच्या संबंधित योजनांवर करणे गरजेचे आहे. वैद्यकीय साधने व सुविधा जास्तीत जास्त जलद व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजनेची नितांत गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोरोना काळापासून ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. ती पूर्वपदावर येण्यासाठी या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेसाठी जास्तीत जास्त निधी मिळणे अपेक्षित आहे. शिवाय आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. ती भरावीत. - डाॅ. गिरीश चौधरी, वाडा
आयुष्मान भारत योजना राबविण्यासाठी पुरेशा निधीचे नियोजन करावे. कोरोनाकाळात मंदी सर्वत्र आल्याने व्यापार व्यवस्था सुधारण्यासाठी नॅशनल रिटेल पॉलिसीमध्ये बदल अपेक्षित आहे. आरोग्यसेवांवर जीएसटी झीरो रेटिंग असावा. - डाॅ. सूर्यकांत चं. संखे, बालरोगतज्ज्ञ, बोईसर
ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्र सक्षम व सशक्तीकरण करून त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज आहे. मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स निर्माण व्हावेत याकरिता जास्तीत जास्त मेडिकल कॉलेजेस सुरू करावीत. त्यामुळे फायदा हाेईल.- डॉ. जितेंद्र पाटील, आर्थोपेडिक सर्जन, बोईसर.
ग्रामीण आरोग्य सुविधांसाठी अधिक काटेकोर व लक्ष देणे गरजेचे आहे. गरीब व गरजू व्यक्तींसाठी विमा संरक्षण व त्याचे परिक्षेत्र वाढविण्याची गरज आहे. - डॉ. रणधीर सं. कदम, शल्यचिकित्सक, तलासरी