Join us

EFC Limited Share : एकावर एक फ्री शेअर देतेय 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; किंमतीत जोरदार तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:21 IST

EFC Limited Share : शुक्रवारच्या इंट्राडे व्यवहारात बीएसईवर कंपनीचा शेअर ४.१३ टक्क्यांनी वधारून ६८४.९० रुपयांवर पोहोचला. पाहा कोणती आहे ही कंपनी.

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचा मोठा फायदा करून दिलाय. तर असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसानही केलंय. रिअल इस्टेट कंपनी - ईएफसी लिमिटेडच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. शुक्रवारच्या इंट्राडे व्यवहारात बीएसईवर ईएफसी लिमिटेडचा शेअर ४.१३ टक्क्यांनी वधारून ६८४.९० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या संचालक मंडळानं बोनस शेअर्सना मंजुरी दिली आहे, यानंतर शेअरमध्ये वाढ झाली आहे. 

काय म्हणाली कंपनी?

ईएफसी लिमिटेडनं शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिलीये. "आम्ही सूचित करतो की कंपनीच्या संचालक मंडळानं इतर गोष्टींसह १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यावर विचार केला आहे आणि त्याला मान्यता दिली आहे." याअंतर्गत पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे एक अतिरिक्त शेअर मिळेल. कंपन्या सहसा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स किंवा लाभांशाच्या माध्यमातून भेट देण्याचा प्रयत्न करतात. गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवणं हा त्याचा उद्देश आहे. तसेच कंपनीचे अधिकृत भागभांडवल १५ कोटींवरून २५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली.

३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात २३०.२६ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा नफा वाढून ३६.५६ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ११.०७ कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न ७२.९३ टक्क्यांनी वाढून १७१.०८ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

शेअरची कामगिरी कशी?

गेल्या सहा महिन्यांत ईएफसीच्या शेअर्सनं चांगली कामगिरी केली आहे. या कालावधीत यात २२ टक्के वाढ झाली, तर गेल्या वर्षभरात त्यात ७८ टक्के वाढ झाली आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७१६.९५ रुपये आहे. त्याचप्रमाणे शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ३०३.१० रुपये होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा