Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 08:43 IST

Mukesh Ambani news: रिलायन्सच्या १० अब्ज डॉलर्सच्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाला चीनचा ब्रेक. विश्वासार्ह तंत्रज्ञान न मिळाल्याने बॅटरी सेल उत्पादन रखडले. वाचा मुकेश अंबानींच्या गीगाफॅक्टरीचे काय होणार?

मुंबई: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 'गीगा फॅक्टरी' स्वप्नाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. चीनमधील कंपन्यांकडून आवश्यक असलेले बॅटरी तंत्रज्ञान मिळवण्यात अपयश आल्याने रिलायन्सने भारतात लिथियम-आयन बॅटरी सेल बनवण्याचा आपला प्लॅन सध्या थांबवला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमधील जामनगर येथे मोठ्या प्रमाणावर लिथियम-आयन सेल निर्मितीचा प्रकल्प उभारणार होती. यासाठी कंपनी जागतिक स्तरावर तंत्रज्ञान भागीदाराच्या शोधात होती. प्रगत लिथियम-आयन तंत्रज्ञानामध्ये चीनचे वर्चस्व असल्याने रिलायन्सने काही चिनी कंपन्यांशी बोलणी सुरू केली होती. मात्र, भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण राजनैतिक संबंधांमुळे तसेच महत्वाचे तंत्रज्ञान बाहेर न जाऊ देण्याच्या भूमिकेमुळे हा प्रकल्प अडकला आहे. चीनने काही विशिष्ट क्षेत्रांतील आपले प्रगत तंत्रज्ञान देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत.

रिलायन्स या वर्षापासून बॅटरी सेलचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत होती. यासाठी चिनी कंपनी 'झियामेन हिथियम एनर्जी स्टोरेज टेक्नॉलॉजी'कडून तंत्रज्ञान परवाना घेण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा आता फिस्कटली असून चिनी कंपनीने या भागीदारीतून माघार घेतली आहे.

या अडचणीनंतर रिलायन्सने आता आपले लक्ष 'बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम'कडे वळवले आहे. कंपनी आता स्वतःच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज साठवण्यासाठी यंत्रणा उभारण्यावर भर देणार आहे. रिलायन्सने २०२१ मध्ये हरित ऊर्जा क्षेत्रात १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती

English
हिंदी सारांश
Web Title : Reliance's Lithium-ion Battery Project Halted as China Denies Technology

Web Summary : Reliance's plan to manufacture lithium-ion batteries in India faces setback. Chinese firms refused technology transfer due to strained relations and export restrictions. Reliance now focuses on battery energy storage systems for renewable energy projects after a $10 billion green energy investment.
टॅग्स :रिलायन्सचीनइलेक्ट्रिक कार / स्कूटरमुकेश अंबानी