Join us

सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:00 IST

startup intern culture : देशात गेल्या काही वर्षात हजारो स्टार्टअप्स उभी राहिली आहेत. यात मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराची कायम चर्चा होत असते. मात्र, पहिल्यांदाच एका संस्थापकडाने इंटर्नला मिळाणाऱ्या पगाराचं धक्कादायक वास्तव सांगितलं आहे.

startup intern culture : मार्क झुकेरबर्ग यांच्या मेटाने नुकतेच एका अभियंत्याला १६०० कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याची बातमी व्हायरल झाली होती. आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगार कायम चर्चेचा भाग असतात. देशातील स्टार्टअप जगताची राजधानी मानल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये, जिथे कोट्यवधी रुपयांच्या फंडिंगच्या बातम्या आणि नव्या 'युनिकॉर्न' कंपन्यांची चर्चा नेहमीच असते, तिथे एका लिंक्डइन पोस्टने खलबळ उडवून दिली आहे. या पोस्टने स्टार्टअप्समधील इंटर्न्सच्या अथक परिश्रम आणि एकप्रकारे शोषणावर प्रकाश टाकला आहे.

बेंगळुरूस्थित संस्थापक शुभम लोंढे यांनी एका अतिशय प्रामाणिक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांची "बेंगळुरू टेक लाईफ" ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

संस्थापक आणि इंटर्नमधील मोठी दरीशुभम लोंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्टार्टअप संस्थापक आणि त्यांच्या इंटर्न्समधील मोठी तफावत स्पष्ट केली आहे. ही तफावत फक्त पगारातच नाही, तर या उद्योगात मेहनत आणि योगदानाला कसे पाहिले जाते, यातही आहे. लोंढे सांगतात की, जिथे एक संस्थापक महिन्याला ५ लाख कमवू शकतो, तिथे इंटर्नला साधारणपणे फक्त १५,००० स्टायपेंड मिळतो. तरीही इंटर्नकडून कामाची मागणी तितकीच तीव्र असते. लोंढे यांनी एका सामान्य परिस्थितीचे वर्णन केले आहे. पहाटे २ वाजता संस्थापक व्हॉइस नोट पाठवून इंटर्नला त्वरित कामात दुरुस्ती करायला सांगतो. मध्यरात्रीही जलद सुधारणा त्यांना अपेक्षित असते.

एकीकडे इंटर्न आधीच कंपनीचे 'पिच डेक' (कामाचे सादरीकरण) तयार करतोय, कमीतकमी संसाधनांमध्ये नवीन उत्पादने स्वतः तयार करतोय आणि आठवड्याच्या शेवटी ग्राहकांच्या तक्रारी हाताळत आहे. तरीही त्याला 'कामाचा लोड' नसल्याचे बोलले जाते.

५०० रुपयांचे ॲमेझॉन व्हाउचर आणि 'निन्जा' ही उपाधी!या कामाच्या पद्धतीचे परिणामही तितकेच विसंगत आहेत. संस्थापक अनेकदा लाखो डॉलर्सचे फंडिंग उभारतात. फोर्ब्स सारख्या प्रसिद्ध मासिकांमध्ये त्यांची प्रोफाइल छापून येतात. पण, इंटर्नचं बक्षीस मात्र खूपच सामान्य असते. लोंढे यांनी हे स्पष्ट करताना म्हटले आहे, की इंटर्नला कामाच्या बदल्यात फक्त ५०० रुपयांचे ॲमेझॉन व्हाउचर आणि लिंक्डइनवर त्यांना "निन्जा" असे संबोधून कौतुक केले जाते. लोंढे यांनी याला "मॉडर्न स्टार्टअप कर्म" असं म्हटलंय.

वाचा - 'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊसशुभम लोंढे यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. विविध उद्योगांमधील व्यावसायिकांकडून हजारो प्रतिक्रिया आणि टिप्पण्या आल्या आहेत. एका लिंक्डइन वापरकर्त्याने याला 'आधुनिक गुलामगिरी' म्हटलंय. तो पुढे म्हणाला, एकतर कोणीही इंटर्नला लवकर कामावर ठेवत नाही. आणि जरी त्यांना नोकरी मिळाली तरी  ५ हजार,  १० हजार किंवा १५ हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळत नाही. काहीजण या प्रकाराचा बचाव करताना दिसले. सीईओ देखील एकेकाळी इंटर्न होते, तेही यातून पुढे आले असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण, काही जणांनी इशारा दिला की हे मॉडेल भविष्यात कदाचित टिकणार नाही. 

टॅग्स :माहिती तंत्रज्ञाननोकरीसोशल मीडियासोशल व्हायरल