Join us

SEBI Restrictions on Research Companies : सेबीच्या निर्बंधांचा परिणाम, धडाधड बंद होताहेत रिसर्च कंपन्या, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:06 IST

Sebi On Research Company : मार्केट रेग्युलेटर सेबीच्या नव्या नियमांमुळे अनेक इक्विटी रिसर्च कंपन्या बंद पडण्याच्या तयारीत आहेत. ८ जानेवारी रोजी सेबीनं रिसर्च अॅनालिस्टसाठी नवे नियम जारी केले.

Sebi On Research Company : मार्केट रेग्युलेटर सेबीच्या (SEBI) नव्या नियमांमुळे अनेक इक्विटी रिसर्च कंपन्या (Equity Research Company) बंद पडण्याच्या तयारीत आहेत. ८ जानेवारी रोजी सेबीनं रिसर्च अॅनालिस्टसाठी नवे नियम जारी केले. शेअर बाजारातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक रोखणं हा त्यामागचा उद्देश होता. नव्या नियमांनुसार, संशोधन कंपन्यांना ग्राहकांशी झालेल्या संभाषणाच्या नोंदी ठेवाव्या लागतील, कम्प्लायन्स ऑडिट करावं लागेल आणि केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या नियमांमुळे छोट्या कंपन्यांचा व्यवसाय चालवण्याचा खर्च खूप वाढला आहे. परिणामी सेंटिनल रिसर्च, स्टॅल्ट अॅडव्हायझर्स आणि मिस्टिक वेल्थ सारख्या काही कंपन्यांनी आपली रिसर्च सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे.

नव्या नियमांमुळे रिसर्च अॅनालिस्ट होणं सोपं झालं असलं तरी आधीच काम करणाऱ्या विश्लेषकांवर नियमांचा बोजा खूप वाढला असल्याचं मार्केट एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. हे नियम अतिशय कडक असून यामुळे बाजारपेठेतील रिसर्चचा दर्जा कमी होऊ शकतो, असं त्यांचं मत आहे. फिन्सेक लॉ अॅडव्हायझर्सचे संस्थापक संदीप पारेख यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये, सेबी आपल्या नियमांमध्ये खूप पुढे जात आहे आणि सक्षम तसंच प्रामाणिक सल्लागार आणि रिसर्चर्सना बाजारातून वगळत आहे, असं म्हटलंय. 

काय म्हणतात तज्ज्ञ?

हे असंच चालू राहिलं तर अकार्यक्षम आणि बेईमान सल्लागार हाच जिवंत राहील, असंही ते म्हणाले. सेंटिनल रिसर्च ही स्वतंत्र रिसर्च फर्म चालवणारे नीरज मराठे यांनीही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी या सूचनांचा मसुदा प्रसिद्ध झाला तेव्हाच त्यांनी आपली रिसर्च सेवा बंद केली. अटी आणि अनुपालनाच्या दृष्टीने प्रत्यक्ष नियम मसुद्यापेक्षा चांगले असतील आणि स्पष्टता आल्यानंतर आपण पुन्हा काम सुरू करू शकू, अशी आशा होती. हे नियम अतिशय वाईट ठरले! मी माझे रिसर्च सर्व्हिस पोर्टलही बंद करत आहे." असं ते म्हणाले.

छोट्या एसआयपीबाबत सूचना

कमी उत्पन्न असलेल्या लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं सोपं जावं यासाठी सेबीनं बुधवारी सूचना मागविल्या आहेत. २५० रुपयांच्या छोट्या हप्त्यांमध्ये एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुरू करण्याचं सेबीनं आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये म्हटलंय. मात्र, हे स्मॉल एसआयपी स्मॉल कॅप आणि मिड कॅप योजना वगळता डेट स्कीम, सेक्टोरियल, थिमॅटिक स्कीम आणि इक्विटी स्कीममध्ये असतील. सध्या काही असेट मॅनेजमेंट कंपन्या (AMC) आपल्या काही योजनांमध्ये कमी रकमेच्या एसआयपी देतात.

टॅग्स :सेबीगुंतवणूकशेअर बाजार