Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल अंबानी यांच्या कंपनीची दमदार कामगिरी; 1 रुपयांचा शेअर 25 रुपयांवर पोहचला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:46 IST

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.

Anil Ambani News : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या अनिल अंबानी यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ झाली. रिलायन्स पॉवरचा शेअर मंगळवारी(दि.14) 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 25.63 रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 4 वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. हा शेअर अवघ्या 1 रुपयांवरुन 25 रुपयांपर्यंत वाढला आहे.

रु. 1 वरुन 25 वर पोहचला शेअरआपल्या सर्वोच्च पातळीपासून घसरुन खाली आलेल्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चांगली वाढ होत आहे. 4 वर्षांपूर्वी 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 1.13 रुपयांवर होते, तर आता 14 मे 2024 रोजी 25.63 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच, गेल्या 4 वर्षात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 2168% ची जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, गेल्या 3 वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 275% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 

1 वर्षात 121% वाढ गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 121% वाढ झाली आहे. 15 मे 2023 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 11.60 रुपयांवर होते, तर 14 मे 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 25.63 रुपयांवर पोहोचले आहेत. अलीकडेच रिलायन्स पॉवरने आपला 45 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प JSW रिन्युएबल एनर्जी लिमिटेडला 132.39 कोटी रुपयांना विकला आहे. आपली मालमत्ता विकून कंपनी सातत्याने आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :अनिल अंबानीशेअर बाजारशेअर बाजाररिलायन्स