Join us  

चिंताजनक! IITमधून शिकल्यानंतरही नोकरीची गॅरंटी नाही, मुंबई IIT मधील ३६% विद्यार्थ्यांना मिळाला नाही रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 2:40 PM

Unemployment: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देशातील बेरोजगारीच्या मुद्दा गंभीरपणे समोर आला आहे. अगदी आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्या मिळण्याची शास्वती राहिलेली नाही.

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देशातील बेरोजगारीच्या मुद्दा गंभीरपणे समोर आला आहे. अगदी आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्या मिळण्याची शास्वती राहिलेली नाही. यावर्षी नोकरीसाठी नोंदणी करणाऱ्या ३५.८ टक्के विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोकरी मिळालेली नाही. मागच्या वर्षी आयआयटी मुंबईच्या ३२ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नव्हती. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयआयटी मुंबई मधील विद्यार्थ्यांना न मिळालेल्या रोजगाराबाबत चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

आयआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारी हे महिने महत्त्वाचे असतात. कारण आयआयटीमध्ये याच काळात प्लेसमेंटचं आयोजन केलं जातं. मात्र मागच्या दोन वर्षांत प्लेसमेंटच्या बाबतीत हजारो विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. नोंदणी केलेल्या २००० विद्यार्थ्यांपैकी ७१२ विद्यार्थ्यांना अद्याप रोजगार मिळालेला नाही.

या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी एक ट्विट करत रोजगाराच्या क्षेत्रातील मोदी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यात राहुल गांधी म्हणाले की, बेरोजगारीच्या आजाराचा संसर्ग आता आयआयटीसारख्या संस्थानांही झाला आहे. आयआयटी मुंबईमधून गतवर्षी ३२ टक्के तर यावर्षी ३६ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकलेली नाही. देशातील प्रतिष्ठित संस्थेची ही परिस्थिती आहे तर भाजपाने संपूर्ण देशाची काय अवस्था करून ठेवली असेल, याची कल्पना करा, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.  

टॅग्स :बेरोजगारीआयआयटी मुंबईलोकसभा निवडणूक २०२४राहुल गांधीनरेंद्र मोदी