Join us

Airtel Share Price: मस्क यांच्या कंपनीसोबत डील, ‘या’ भारतीय कंपनीच्या शेअरला लागले पंख; किंमत ₹ १७०० पार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:28 IST

Airtel Share Price:या कंपनीचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात ३ टक्क्यांनी वधारून १७१७.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे एक मोठी डील आहे.

Airtel Share Price: टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे शेअर्स (Bharti Airtel Stocks) बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात ३ टक्क्यांनी वधारून १७१७.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे एक मोठी डील आहे. मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर एअरटेलनं इलॉन मस्क (Elon Musk) यांची कंपनी स्पेसएक्ससोबत (SpaceX) झालेल्या कराराची माहिती दिली. भारतातील ग्राहकांना स्टारलिंकची हायस्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी कंपनीनं अमेरिकन अब्जाधीश मस्क यांची उपग्रह कंपनी स्पेसएक्ससोबत भागीदारी केली आहे.

अधिक माहिती काय?

एअरटेलनं यासंदर्भात एक निवेदनात जारी केलं आहे. हा करार स्पेसएक्सला स्टारलिंकच्या उपग्रह दळणवळण-आधारित सेवा भारतात देण्याची परवानगी मिळविण्याच्या अधीन आहे. या करारामुळे एअरटेल आणि स्पेसएक्सला स्टारलिंक एअरटेलच्या ऑफरला कसं पूरक आणि विस्तारित करू शकते याचा शोध घेता येणार असल्याचं त्यात म्हटलंय.

भारतातील एअरटेल ग्राहकांना स्टारलिंक सेवा प्रदान करण्यासाठी स्पेसएक्सबरोबर काम करणे हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे आणि नेक्स्ट जनरेशन सॅटलाईट कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीची वचनबद्धता दर्शवत असल्याची प्रतिक्रिया भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विट्टल यांनी दिली.

स्टॉक्सची स्थिती

भारती एअरटेलच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत तब्बल ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्षभरात हा शेअर ४० टक्क्यांनी वधारलाय. पाच वर्षांत हा शेअर २५० टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १,७७८.९५ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १,१५१.३० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ९,४९,०८६ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारएलन रीव्ह मस्कएअरटेल