Join us
Daily Top 2Weekly Top 5

Adani च्या 'चीन कनेक्शन'वरून विरोधकांचा हल्लाबोल; पण मॉरिस चांग म्हणाले, "मी तर तैवानचा नागरिक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 15:06 IST

अदानी समूहाच्या चीनसोबतच्या कथित संबंधांच्या केंद्रस्थानी असलेल्या मॉरिस चांग यांचं नाव विरोधकांकडून घेण्यात आलं होतं.

अदानी समूहाच्या चीनसोबतच्या कथित संबंधांच्या केंद्रस्थानी असलेल्या मॉरिस चांग यांचं नाव विरोधकांकडून घेण्यात आलं होतं. परंतु यावर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी पुढे येत आपण तैवानचे नागरिक असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यापूर्वी त्यांच्या नागरिकत्वावरून वाद झाला होता. चांग हे पीएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत. कंपनी अदानी समूहासाठी बंदरे, टर्मिनल, रेल्वे लाईन, पॉवर ट्रान्समिशन लाइन आणि इतर पायाभूत सुविधा तयार करते. त्यांच्या पासपोर्टमुळे त्यांना चिनी नागरिक म्हटलं जात होतं आणि त्यामुळे अदानी समूहाचं नावही चीनशी जोडण्यात आलं होतं.

"मी तैवानचा नागरिक आहे. माझ्या पासपोर्टवरून मी 'रिपब्लिक ऑफ चायना'चा नागरिक आहे हे दिसतं, आता अधिकृतपणे तैवान म्हणून ओळखले जाते. हे चीनपेक्षा वेगळं आहे. ज्याला अधिकृतपणे 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' म्हटलं जातं,” असं चँग यांनी ईमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं.

काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला करण्यासाठी चांग यांच्या कथित चिनी ओळखीचा वापर केला होता. चीनशी कथित संबंध असूनही अदानी यांना भारतातील बंदर चालवण्याची परवानगी का देण्यात आली आणि सुरक्षेची चिंता का विचारात घेतली गेली नाही, असा सवाल काँग्रेसनं केला होता.

अदानी समूहावर भाष्यअदानी समूहासोबत पीएमसी पूर्ण करत असलेल्या प्रकल्पांच्या प्रश्नांना मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही. अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी आयात केलेल्या उपकरणांच्या किमती वाढवल्याचा आरोपही पीएमसीवर आहे. “मी तैवानमधील एक सुस्थापित उद्योजक आहे. जागतिक व्यापार, जहाजबांधणी, पायाभूत सुविधा प्रकल्प, जहाज तोडणी या क्षेत्रात माझे व्यावसायिक हितसंबंध आहेत,” असंही त्यांनी म्हटलं. “जिथे अदानी समूहाचा संबंध आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा स्थितीत यावर काहीही बोलणं योग्य नाही. ‘माझ्या नागरिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याला राजकीय मुद्दा बनवला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी तुम्हाला माझ्या नागरिकत्वाबद्दल आधीच सांगितलं आहे. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही,” असं चांग यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :अदानीचीनकाँग्रेस