Cyber Crime : तुम्हाला पोलीस अथवा सीबीआयकडून फोन आला तर सावध व्हा, हे सायबर गुन्हेगार असू शकतात, अशी सूचना काही दिवसांपासून तुम्ही फोन लावल्यावर ऐकली असेलच. हे अचानक का सुरू झालंय माहितीय का? कारण सायबर गुन्हेगारी आता हाताबाहेर चालली आहे. सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या हजारो तक्रारी रोज दाखल होत आहेत. धक्कादायक म्हणजे यांचं टार्गेट हे बहुतेक शिक्षित लोक आहेत. त्यामुळे सरकारचं आणखी टेन्शन वाढलं आहे. इतकी जनजागृती करुनही लोक याला बळी पडत आहेत. अशाच एका घटनेत एका तरुणीने तब्बल ५६ लाख रुपये गमावले आहेत.
देशातील आयटी सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरूमध्ये ही घटना घडली. येथील एका टेक कंपनीचे मुख्य लेखा अधिकारी ग्लोरिया (नाव बदलले आहे) यांना एमडीच्या नावाने व्हॉट्सॲपवर मेसेज आला. हा मेसेज कंपनीच्या एमडीने पाठवल्याचे समजून ग्लोरियाने तब्बल ५६ लाख रुपये ट्रान्सफर केले. नंतर हा मेसेज एमडीने नाही तर फसवणूक करणाऱ्यांनी पाठवल्याचे उघड झाले.
कशी झाली सायबर फसवणूक?काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने सीरम इंन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांची फसवणूक झाली होती. त्यांच्या कंपनीच्या मुख्य अकाउंटला पुनावाला यांच्या नावाने १ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यासाठी मॅसेज आला होता. सुदैवाने या घटनेत हे पैसे परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं. असाच ट्रॅप बेंगळुरूच्या घटनेतही वापरण्यात आला. सायबर गुन्हेगाराने यासाठी आपल्या व्हॉट्सअप प्रोफाईलला टेक कंपनीच्या एमडीचे प्रोफाईल पिक्चर आणि कंपनीचा लोगो लावला होता. या नंबरवरुन त्या कंपनीच्या सीएओला ५ डिसेंबरला मॅसेज पाठवण्यात आला.
"मी एमडी असून एका प्रकल्प फायनल करत आहे. त्यासाठी ५६ लाख रुपयांची सुरक्षा ठेव द्यावी लागेल. कंपनीच्या खात्यातून पेमेंट करा." ग्लोरियाने ताबडतोब २ खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. नंतर तिला संशय आल्यावर तिने एमडीला ईमेल केला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांनी तिला कुठलाही मॅसेज केला नसल्याचे स्पष्ट केले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्लोरियाने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
पैसे अनेक खात्यात ट्रान्सफरपोलीस निरीक्षक ईश्वरानी पीएन आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. टेक कंपनीचे पैसे अनेक बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाल्याचे तपासात समोर आले आहे. हैदराबादमध्ये एक खाते साई कुमारच्या नावावर होते. डीसीपी (दक्षिण-पूर्व) सारा फातिमा आणि हैदराबाद पोलिसांनी कुमारला पकडले. ग्रीष्मा नावाच्या महिलेच्या सांगण्यावरून आपण हे खाते उघडल्याचे साई कुमारने पोलिसांना सांगितले. ग्रिष्मा त्याला प्रत्येक १० लाख रुपयांमागे १०००० ते १५,००० रुपये कमिशन देत असे. पोलिसांनी ग्रीष्माच्या घरावर छापा टाकून तिला त्याच्या साथीदारांसह ८ डिसेंबर रोजी अटक केली.
कोण आहे ग्रीष्मा?ग्रिष्मा हा क्रिप्टोकरन्सी ट्रेडर असल्याचे समोर आले. तिने सांगितले की क्रिप्टो कंपनीतील व्यवहारादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला होता. जास्त कमाईचे आमिष दाखवून त्याने ग्रीष्माला आपल्यासोबत काम करण्याची ऑफर दिली. त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ग्रीष्माने U-homeEX नावाचे ॲप डाउनलोड केले आणि त्यावर नोंदणी केली. ग्रिष्माचे काम बँक खाती उपलब्ध करून देणे होते, ज्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. खात्यात आलेले पैसे काढून, USDT (क्रिप्टोकरन्सीचा एक प्रकार) मध्ये रूपांतरित केले जात. नंतर हे अनोळखी लोकांना विकून पैसे कमावत होती.