Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:26 IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात असा एक धक्का बसला, ज्यानं गुंतवणूकदारांची झोप उडवली. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या आणि सरकारच्या एका निर्णयानं का बसला इतका मोठा झटका.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात असा एक धक्का बसला, ज्यानं गुंतवणूकदारांची झोप उडवली. सरकारच्या एका निर्णयामुळे तंबाखू आणि सिगरेट क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री (Sell-off) झाली, ज्यामुळे अवघ्या काही तासांत सुमारे ६०,००० कोटी रुपयांचे मार्केट कॅप साफ झालं. या घसरणीमध्ये देशातील सर्वात मोठी सिगरेट उत्पादक कंपनी ITC आणि Godfrey Phillips India या आघाडीवर होत्या, ज्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली.

दरम्यान, अर्थ मंत्रालयानं १ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील एक्ससाईज ड्युटीमध्ये मोठी वाढ करण्याची अधिसूचना जारी केली आहे. नवीन नियमांनुसार, सिगरेटची लांबी आणि श्रेणीनुसार प्रति १००० स्टिक्सवर २०५० रुपये ते ८५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्साईज ड्युटी आकारली जाईल. हा कर सध्याच्या ४०% जीएसटीच्या वर लावला जाईल. ही बातमी बाजारात येताच गुंतवणूकदारांनी या शेअर्सपासून दूर राहणं पसंत केलं.

कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला

ITC आणि Godfrey Phillips वर मोठा परिणाम

या निर्णयाचा सर्वाधिक फटका ITC ला बसला, ज्याची सिगरेट बाजारपेठेत सुमारे ७५% भागीदारी आहे. कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे ९.७% घसरण झाली, जी मार्च २०२० नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली. दुसरीकडे, Godfrey Phillips India चा शेअर १७% पेक्षा जास्त तुटला. व्हीएसटी इंडस्ट्रीज (VST Industries) आणि एनटीसी इंडस्ट्रीजमध्येही (NTC Industries) घसरण नोंदवण्यात आली.

विक्रीच्या व्हॉल्युमवर संकट

ब्रोकरेज हाऊसच्या मते, नजीकच्या भविष्यात सिगरेटच्या विक्रीवर (Volume) दबाव येऊ शकतो. नुवामा इन्स्टिट्यूशनल रिसर्चनं म्हटलं की इतिहासात पाहिलं तर इतक्या मोठ्या कर वाढीनंतर विक्रीमध्ये ३% ते ९% पर्यंत घट दिसून येते. जेफरीजच्या अंदाजानुसार, कराचा बोजा ग्राहकांवर टाकण्यासाठी ITC ला किमतीत किमान १५% पर्यंत वाढ करावी लागू शकते.

ITC ची भक्कम स्थिती

परंतु, सर्व तज्ज्ञ पूर्णपणे निराश नाहीत. फिसडमचे नीरव करकरा यांचं म्हणणे आहे की, ITC सारख्या मोठ्या कंपनीकडे मजबूत ब्रँड, चांगलं मार्जिन आणि वैविध्यपूर्ण व्यवसाय मॉडेल आहे, ज्यामुळे ती हा धक्का हळूहळू पचवू शकते. दुसरीकडे, छोट्या कंपन्यांवर याचा परिणाम अधिक खोल असू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Government decision hits tobacco firms hard; shares plummet, ₹60,000 crore lost.

Web Summary : A government decision on excise duty increases on tobacco products caused a massive sell-off in the stock market, wiping out ₹60,000 crore. ITC and Godfrey Phillips India were significantly impacted due to expected volume decline.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा