Join us

१२-१५ महिने एसआयपीमध्ये गुंतवणूक केली, तरीही परतावा शून्य; 'या' ५ चुका टाळा, मोठा परतावा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:10 IST

SIP Investment Rule: गेल्या वर्षभरात, अनेक गुंतवणूकदारांच्या एसआयपीच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. सातत्याने गुंतवणूक करूनही, त्यांचे पोर्टफोलिओ स्थिर राहिले आहेत.

SIP Returns : शेअर बाजारातगुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी ही सध्या सर्वात सोपी आणि लोकप्रिय पद्धत आहे. लाखो सामान्य लोक दर महिन्याला लहान हप्त्यांमध्ये पैसे गुंतवून दीर्घकाळात मोठी संपत्ती उभी करण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, गेल्या एका वर्षात अनेक गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. अनेक जण सोशल मीडियावर तक्रार करत आहेत की, १२ ते १५ महिने एसआयपी करूनही पोर्टफोलिओ एकतर नकारात्मक आहे किंवा 'फ्लॅट' आहे. तुमचीही एसआयपी असेल तर आत्ताच या सुधारणा करा अन्यथा पुढचा नंबर तुमचा असेल.

१. बाजारातील अस्थिरता आणि 'झीरो रिटर्न'सन २०२४ पासून शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. जागतिक व्यापार युद्ध, टॅरिफ वाद आणि भू-राजकीय तणाव यामुळे बाजारातील वातावरण बिघडले आहे. याचा थेट परिणाम इक्विटी म्युच्युअल फंडांवर झाला आहे. अनेक आघाडीच्या इक्विटी योजनांनी गेल्या एका वर्षात नकारात्मक परतावा दिला आहे, तर उर्वरित योजनांचा परतावा ० ते १ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.

२. एसआयपीचे मूल्यांकन अल्प काळात करू नकाएसआयपीचा खरा फायदा हा नेहमी दीर्घकाळात दिसतो. १ ते २ वर्षांच्या कामगिरीवरून एसआयपीला कमी लेखणे सर्वात मोठी चूक आहे. टाटा स्मॉल कॅप फंडने गेल्या वर्षी -४% परतावा दिला असला, तरी ३ वर्षांत २१% आणि ५ वर्षांत ३१% वार्षिक परतावा दिला आहे. तसेच, श्रीराम फ्लेक्सी कॅप फंडनेही १ वर्षात नकारात्मक परतावा दिला असून, ३ वर्षांत १३% आणि ५ वर्षांत १६% वार्षिक परतावा दिला आहे.

३. घाईघाईत फंड बदलणे टाळाजर तुमच्या फंडाची कामगिरी थोडी कमी होत असेल, तर तो लगेच बदलण्याची घाई करू नका. बाजार अस्थिर असताना हे सामान्य आहे. मात्र, जर तुमच्या फंडाच्या कामगिरीत सातत्याने मोठा फरक दिसत असेल, तर चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच पुढील पाऊल उचला. विनाकारण जास्त फंडांमध्ये पैसा गुंतवणे टाळा.

४. पोर्टफोलिओ विविधीकरण आवश्यकतुमचा पोर्टफोलिओ वेगवेगळ्या कॅटेगरी आणि क्षेत्रांमध्ये विभागणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही मल्टी-कॅप आणि फ्लेक्सी-कॅप फंडांची मदत घेऊ शकता. परंतु, ८ ते १० वेगवेगळ्या फंडांमध्ये पैसा विखुरल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. ४ ते ५ चांगले फंड निवडून त्यात एसआयपी करणे हा संतुलित आणि प्रभावी मार्ग आहे.

५. घसरणीत एसआयपी थांबवण्याची चूक टाळाबाजार घसरत असताना एसआयपी थांबवणे किंवा पैसे काढून घेणे, ही गुंतवणूकदार म्हणून केलेली सर्वात मोठी आणि नुकसानकारक चूक आहे. एसआयपीचा फायदाच हा आहे की, बाजारातील घसरणीमध्ये तुम्हाला जास्त युनिट्स कमी भावात मिळतात. बाजार जेव्हा परत सुधारतो, तेव्हा हीच स्वस्त युनिट्स मोठा नफा देतात. एसआयपी थांबवल्यास हा फायदा तुम्ही गमावून बसाल.

गुंतवणुकीपूर्वी जोखीम क्षमता ओळखाप्रत्येक गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते. जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत असाल, तर दीर्घकाळ (किमान ५ वर्षे) इक्विटी एसआयपी योग्य आहे. पण जर तुमची जोखीम मध्यम असेल, तर इक्विटी, डेट आणि हायब्रिड फंडांचे मिश्रण असलेला संतुलित पोर्टफोलिओ तयार करा, ज्यामुळे चढ-उतार कमी होतील.

वाचा - १०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?

डिस्क्लेमर: हा लेख केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी कृपया प्रमाणित तज्ज्ञांचा किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Zero SIP Returns? Avoid These 5 Mistakes for Bigger Gains

Web Summary : Struggling with SIP returns? Market volatility and short-term evaluation are key pitfalls. Diversify your portfolio, avoid hasty fund switches, and don't stop SIPs during market dips. Understand your risk tolerance for balanced growth.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकपैसा