Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEBI चा मोठा प्लॅन! आता विना नॉमिनी 'हे' महत्त्वाचं काम करताच येणार नाही, नियम बदलण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:22 IST

Sebi Nominee New Rule: गुंतवणूकदारांसाठी लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. सेबी लवकरच नियमांमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे.

Sebi Nominee New Rule: गुंतवणूकदारांसाठी लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. भारतीय बाजार नियामक सेबीनं (SEBI) डीमॅट आणि म्युच्युअल फंड खात्यांमधील नॉमिनी संदर्भातील नियमांमध्ये बदलाचा प्रस्ताव मांडला आहे. जर हे नियम लागू झाले, तर आता नॉमिनी जोडल्याशिवाय कोणतंही नवीन खातं उघडणं शक्य होणार नाही. म्हणजेच, नॉमिनी हा आता 'डिफॉल्ट' पर्याय बनवला जाऊ शकतो.

SEBI च्या मते, सध्या अनेक गुंतवणूकदार त्यांच्या खात्यात नॉमिनी जोडत नाहीत किंवा पूर्ण माहिती देत नाहीत. यामुळे गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत पैशांवर दावा करणं कठीण होतं. अनेक प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यांना लांबलचक प्रक्रियेतून जावं लागतं. या समस्या दूर करण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे.

NHAI चा झटका, प्रवास महागणार, १ एप्रिलपासून वार्षिक टोल पास ₹३,००० नाही, तर इतक्या रुपयांना मिळणार

काय आहे नवीन प्रस्ताव?

SEBI ने आपल्या सल्लागार पत्रात काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत:

  • खातं उघडताना नॉमिनी जोडणं हे डिफॉल्ट असेल.
  • नॉमिनीबद्दल जास्त माहिती देण्याची गरज नसेल, फक्त नाव आणि नातं सांगणं पुरेसं असेल.
  • पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल यांसारखी माहिती ऐच्छिक असेल.
  • आता जास्तीत जास्त चार नॉमिनी जोडता येतील.
  • जर हिस्सा निश्चित केला नसेल, तर रक्कम सर्व नॉमिनींमध्ये समान वाटली जाईल.
  • जर कोणाला नॉमिनी ठेवायचा नसेल, तर तशी लेखी घोषणा द्यावी लागेल.

नवीन नियम कधी लागू होणार?

SEBI ने या प्रस्तावांवर सर्वसामान्य जनता आणि संबंधितांकडून ७ एप्रिल २०२६ पर्यंत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे अंतिम नियम ठरवले जातील. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्येही नॉमिनी संदर्भातील नियमांत बदल करण्यात आले होते, परंतु काही अडचणी समोर आल्यानंतर आता ते अधिक सोपे करण्याची तयारी सुरू आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावं?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, गुंतवणूकदारांनी आपल्या डीमॅट आणि म्युच्युअल फंड खात्यांमध्ये नॉमिनी नक्कीच जोडला पाहिजे. यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास टाळता येईल. नवीन नियम लागू झाल्यास गुंतवणूक प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि सुरक्षित होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : SEBI's New Rule: Nominee Mandatory for Demat, Mutual Fund Accounts.

Web Summary : SEBI proposes mandatory nominee addition for new Demat and Mutual Fund accounts. This aims to simplify claim processes for families in emergencies. The new rule seeks to make investing easier and more secure by streamlining the nomination process and reducing future complications.
टॅग्स :सेबीम्युच्युअल फंडगुंतवणूक