jio blackrock : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत व्यवसायात जिथे पाऊल ठेवलं आहे, तिथं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. रिलायन्सजिओ त्याचं मोठं उदाहरण आहे. आता अंबानी पुन्हा एकदा नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहेत. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सची फायनान्स विंग जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जगातील सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉक यांनी एकत्र येऊन भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात मोठे पाऊल टाकले आहे. या भागीदारीअंतर्गत, 'जिओ ब्लॅकरॉक' ने तीन नवीन डेट फंड बाजारात आणले आहेत. हे फंड खास करून कमी जोखीम असलेल्या आणि कमी काळासाठी गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी आहेत. पण, हा डेट फंड नेमका काय आहे आणि जिओ-ब्लॅकरॉकने याच फंडपासून सुरुवात का केली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
डेट फंड म्हणजे काय?डेट फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे, जो तुमचे पैसे सरकारी बाँड, कंपन्यांची कर्जे, ट्रेझरी बिल आणि इतर निश्चित व्याज देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवतो. याचा अर्थ, तुम्ही यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला शेअर बाजारासारख्या चढ-उतारांची भीती नसते, कारण तुम्हाला निश्चित व्याज मिळते.
डेट फंडचे अनेक प्रकार आहेत, जसे की
- लिक्विड फंड: यात तुम्ही अगदी काही दिवसांसाठीही पैसे गुंतवू शकता.
- शॉर्ट टर्म फंड: कमी काळासाठी गुंतवणूक.
- लॉन्ग टर्म फंड: दीर्घ काळासाठी गुंतवणूक.
तुम्ही डेट फंड निवडताना तुमचा गुंतवणुकीचा कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेतली पाहिजे.
डेट फंड्सचे खास फायदेकमी जोखीम, स्थिर परतावा:डेट फंड हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या फंडांपेक्षा खूप कमी जोखीम असलेले असतात. त्यामुळे ज्यांना बाजारातील चढउतार आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
एफडीपेक्षा चांगला परतावाया फंडातून मिळणारा परतावा साधारणपणे बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) पेक्षा थोडा जास्त असतो, विशेषतः कर भरल्यानंतर.
कर लाभजर तुम्ही डेट फंडमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केली, तर तुम्हाला 'इंडेक्सेशन'चा फायदा मिळतो. यामुळे तुम्हाला कमी कर भरावा लागतो.
जिओ-ब्लॅकरॉकने डेट फंडपासून सुरुवात का केली?जिओ-ब्लॅकरॉकने थेट शेअर बाजारातील फंड न आणता डेट फंडपासून सुरुवात करण्यामागे काही खास कारणे असू शकतात.
- सुरक्षित सुरुवात: कोणत्याही नवीन कंपनीसाठी बाजारात प्रवेश करताना कमी जोखीम असलेल्या उत्पादनांपासून सुरुवात करणे सोपे असते. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास लवकर जिंकता येतो.
- मोठे ग्राहक वर्ग: भारतात असे कोट्यवधी लोक आहेत, जे बँक एफडीपेक्षा चांगला आणि सोयीस्कर पर्याय शोधत आहेत. त्यांच्यासाठी लिक्विड डेट फंड हा एक चांगला पर्याय आहे.
- अनुभव दाखवण्याची संधी: डेट फंडमध्ये स्थिर परतावा मिळतो, त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या फंड व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव दाखवण्याची संधी मिळते.
वाचा - व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
जिओ आणि ब्लॅकरॉक या दोन मोठ्या नावांनी एकत्र येऊन म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश केल्यामुळे, गुंतवणूकदारांना आता नवीन आणि सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.