Mutual Fund New Rules : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठीसेबीनं (SEBI) नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता गुंतवणूकदार आपला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) भरण्याच्या तारखेच्या तीन दिवस आधी बंद करू शकतील किंवा त्याचा हप्ता थांबवू शकतील. म्युच्युअल फंड कंपनीला अर्ज मिळाल्यानंतर दोन दिवसांत (T+2) ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणारे. यामुळे गुंतवणूकदारांना दंड आणि इतर आर्थिक अडचणी टाळण्यास मदत होईल. हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
यापूर्वी कशी होती प्रक्रिया?
यापूर्वी गुंतवणूकदारांना एसआयपी रद्द करण्यासाठी १० दिवस अगोदर अर्ज करावा लागत होता. या कालावधीत बँक खात्याच्या स्थितीचा अचूक अंदाज बांधणं अवघड होतं, ज्यामुळे अनेकवेळा हप्ते बाऊन्स होत होते. परिणामी गुंतवणूकदारांना ईसीएस किंवा मॅन्डेट रिटर्न चार्जेस सारखे अतिरिक्त शुल्क भरावं लागत होतं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सेबीनं एसआयपी रद्द करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. नवीन नियम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या एसआयपीला लागू होईल.
अशी नवी प्रक्रिया समजून घ्या
समजा एखाद्या गुंतवणूकदाराचा एसआयपी हप्ता दर महिन्याच्या १० तारखेला जात असेल आणि महिन्याच्या ७ तारखेपर्यंत त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील, अशा परिस्थितीत तो ७ तारखेला एसआयपी थांबवण्याची किंवा थांबवण्याची विनंती करू शकतो. म्युच्युअल फंड कंपनीला १० तारखेपूर्वी ते रद्द करावं लागणार आहे. दरम्यान, गुंतवणूकदाराकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही.
म्युच्युअल फंड कंपन्यांना सूचना
१. कंपन्यांना आता दोन दिवसांच्या आत ऑटो-डेबिट किंवा ईसीएस मँडेट रद्द करावे लागतील.२. गुंतवणूकदाराचा पहिल्यांदा एसआयपीचा हप्ता चुकल्यास त्याची माहिती द्यावी लागेल.३. जर गुंतवणूकदारानं सलग तीन वेळा हप्ता भरला नाही तर एसआयपी पूर्णपणे बंद होईल, याची माहिती त्यांना द्यावी लागेल.४. एसआयपी रद्द झाल्याची माहिती गुंतवणूकदाराला मेसेज पाठवून कळवावी लागेल.५. एसआयपी रद्द करण्याचा पर्याय सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून द्यावा लागेल.
गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
म्युच्युअल फंड उद्योगातील पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांचे हक्क अधिक बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल म्हणून सेबीचा हा निर्णय मानला जात आहे. या नव्या नियमामुळे एसआयपी गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता दंडाचं टेन्शनही राहणार नाही आणि ते आपल्या गुंतवणुकीवर चांगले नियंत्रण ठेवू शकतील.