health insurance : अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा देतात, ज्यामुळे वैद्यकीय खर्चाची चिंता कमी होते. काही लोक यासोबतच स्वतःचा वैयक्तिक आरोग्य विमा देखील घेतात. जेणेकरुन कुटुंब अधिक सुरक्षित राहील. पण तुम्हाला माहित आहे का, गरज पडल्यास तुम्ही या दोन्ही आरोग्य विम्याचा एकत्र वापर करू शकता? चला तर मग जाणून घेऊया याची सोपी प्रक्रिया.
समजा, तुम्हाला अचानक ६ लाख रुपयांच्या वैद्यकीय खर्चाची गरज भासली. तुमच्या कंपनीच्या विम्याद्वारे ३ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते आणि तुमच्या स्वतःच्या विम्याद्वारे ५ लाख रुपयांपर्यंत. अशा स्थितीत तुम्ही दोन्ही विम्याचा लाभ घेऊ शकता.
कशी करावी क्लेमची प्रक्रिया?
- कमी कव्हर देणाऱ्या कंपनीला कळवा : सर्वात आधी तुमच्या कंपनीच्या आरोग्य विमा कंपनीला तुमच्या वैद्यकीय खर्चाबद्दल माहिती द्या. यामुळे तुम्ही दुसऱ्या विम्याचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरता.
- कॅशलेस क्लेमसाठी प्रयत्न करा: शक्य असल्यास रुग्णालयात कॅशलेस क्लेमसाठी मंजुरी मिळवा.
- दुसऱ्या कंपनीला माहिती द्या: जर तुमच्या उपचाराचा खर्च कंपनीच्या विमा रकमेपेक्षा जास्त असेल, तर तुमच्या वैयक्तिक आरोग्य विमा कंपनीला तुमच्या वैद्यकीय खर्चाची माहिती द्या.
- उर्वरित रक्कम भरा: दुसऱ्या विमा कंपनीकडून पैसे मिळेपर्यंत तुम्हाला तुमच्याकडील उर्वरित रक्कम भरावी लागू शकते.
- कागदपत्रे जमा करा: रुग्णालयातून तुमच्या उपचाराची सर्व बिले, डिस्चार्ज रिपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे घ्या.
- पहिल्या कंपनीचे सेटलमेंट लेटर घ्या: तुमच्या कंपनीच्या विमा कंपनीकडून तुम्हाला किती रक्कम मिळाली याचे सेटलमेंट लेटर (म्हणजे अंतिम हिशोबाचे पत्र) घ्या.
- दुसऱ्या कंपनीकडे कागदपत्रे सादर करा: आता तुमच्या वैयक्तिक विमा कंपनीकडे सेटलमेंट लेटर, रुग्णालयाची बिले आणि तुमचे ओळखपत्र (केवायसी डॉक्युमेंट्स) जमा करा.
- अतिरिक्त कागदपत्रे: दुसरी विमा कंपनी पडताळणीसाठी तुमच्याकडून आणखी काही कागदपत्रे मागू शकते, ती त्यांना सादर करा.
- पडताळणीसाठी वेळ: दुसरी कंपनी तुमच्या दाव्याची (क्लेमची) व्यवस्थित तपासणी करते, त्यामुळे यासाठी काही दिवस लागू शकतात.
- पैसे जमा: तपासणी पूर्ण झाल्यावर, तुमच्या विमा पॉलिसीनुसार उर्वरित क्लेमची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
वाचा - गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कंपनीच्या आणि स्वतःच्या आरोग्य विम्याचा एकत्रितपणे वापर करून मोठ्या वैद्यकीय खर्चाच्या वेळी आर्थिक भार कमी करू शकता. त्यामुळे, जर तुमच्याकडे दोन आरोग्य विमा पॉलिसी असतील, तर या प्रक्रियेची माहिती असणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.