Health Insurance : कोरोनानंतर आरोग्य विम्याचे महत्त्व लोकांना समजलं असून विमा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. आजारपण आणि रुग्णालयात भरतीमुळे आपली आयुष्यभराची जमापुंजी काही दिवसात संपून जाऊ शकते. अशा परिस्थितीत, आरोग्य विमा खरेदी करणे हे एक शहाणपणाचे पाऊल आहे. जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्ही त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा पैसे देऊनही ऐनवेळी खिशातून पैसे भरावे लागतील.
काय काळजी घ्यावी?आपल्या विम्यात कोणते आजार कव्हर आहेत? कोणते नाहीत? हे माहिती करुन घ्या. काही आजारांनी प्रतिक्षा कालावधी असतो. हॉस्पिटलायझेशनशी संबंधित विविध खर्चांवर निर्बंध किंवा मर्यादा असतात. त्या तपासून घ्या. काही विम्यात खर्चाची भागीदारी असते. म्हणजे ८० टक्के कंपनी भरणार आणि २० टक्के तुम्ही भरायचे. रूम खर्चाला मर्यादा. विमा घेताना कुठलाही आजार लपवू नका. अन्यथा एखाद्या जुन्या आजारासाठी तुम्हाला विमा नाकारला जाऊ शकतो. उदा. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह सारखे आजार.
पॉलिसी एंट्रीच्या वेळी वयानुसार कंपनीला वैद्यकीय चाचणी अहवालाची आवश्यकता असू शकते, तुम्ही सर्व प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या आवश्यकतांचे पालन केले पाहिजे. वैद्यकीय चाचण्या कुठे आणि कशा केल्या जातील ते तपासा. या तपासणीचा खर्च कोण करणार हेही विचारुन घ्या. ऐनवेळी कटकट नको. विमा कंपनीने तुमचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतरच प्रीमियम भरा. प्रत्येकवेळी सावधपणे पॉलिसीचे नूतनीकरण करा.
काय करू नये?तथ्य लपवू नका अन्यथा दाव्याच्या वेळी तुम्हाला वादाला सामोरे जावे लागू शकते. तुमच्या पॉलिसीच्या नूतनीकरणामध्ये खंड पडू देऊ नका. अन्यथा तुमचे कव्हर अपुरे किंवा निरुपयोगी होऊ शकते. लक्षात ठेवा विमा कंपन्या बहुतेक विमा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा परिस्थिती अशी एकही चूक करू नका, जेणेकरुन कंपन्यांना दावा नाकारायला कारण मिळेल.