Postal Life Insurance’s Yugal Suraksha : आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन देणाऱ्या जोडप्यांसाठी आता पोस्ट ऑफिसने एक खास योजना आणली आहे! पोस्टल लाइफ इन्शुरन्सची 'युगल सुरक्षा योजना' ही विवाहित जोडप्यांसाठी एक विशेष संयुक्त जीवन विमा पर्याय आहे. या योजनेत फक्त एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघांनाही एकत्र विमा संरक्षण मिळतं. विशेष म्हणजे, तुम्ही २०,००० रुपयांपासून ते ५० लाखांपर्यंत विमा रक्कम निवडू शकता.
'युगल सुरक्षा' कोणासाठी आहे?ही पॉलिसी केंद्र सरकारकडून पूर्णपणे संरक्षित असून मुदतपूर्तीनंतर चांगला बोनसही दिला जातो. केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी, निम-सरकारी संस्थांमध्ये काम करणारे लोक, तसेच डॉक्टर, इंजिनिअर, व्यवस्थापन सल्लागार, वकील आणि बँक कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधील कर्मचारीही यासाठी पात्र आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी पती-पत्नीपैकी किमान एकाची वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावी.
पॉलिसीची मुख्य वैशिष्ट्ये
- संयुक्त विमा: पती-पत्नी दोघांनाही एकाच पॉलिसीमध्ये विमा आणि बोनसचा लाभ मिळतो.
- विमा रक्कम: किमान २०,००० रुपये ते कमाल ५० लाख रुपये.
- वयोमर्यादा: अर्ज करताना दोघांचे वय २१ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- कर्ज सुविधा: ३ वर्षांनंतर पॉलिसीवर कर्ज घेता येतं.
- मृत्यू लाभ: दुर्दैवाने, पती-पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाल्यास, विमा रक्कम आणि जमा झालेला बोनस दुसऱ्या जोडीदाराला मिळतो.
- बोनस: सध्या प्रति १,००० रुपयांच्या विम्यावर वार्षिक ५८ रुपये बोनस दिला जात आहे.
- प्रीमियम पर्याय: मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरण्याची सोय आहे.
- पॉलिसीची मुदत: किमान ५ वर्षे ते जास्तीत जास्त २० वर्षांसाठी ही पॉलिसी घेता येते.
प्रीमियमची गणना आणि परतावा (उदाहरण)
- समजा, एक पती ३० वर्षांचा आहे आणि त्याची पत्नी २८ वर्षांची आहे. त्यांनी २० वर्षांसाठी १० लाखांची 'युगल सुरक्षा' पॉलिसी घेतली. त्यांना २० वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
- जर त्यांनी मासिक प्रीमियम निवडला, तर पहिल्या वर्षी त्यांना दरमहा ४,३९२ प्रीमियम भरावा लागेल (पहिल्या वर्षी थोडा जास्त GST असतो).
- दुसऱ्या वर्षापासून त्यांना दरमहा ४,२९७ प्रीमियम भरावा लागेल.
- अशा प्रकारे, २० वर्षांत एकूण सुमारे १०.३० लाख प्रीमियम भरल्यानंतर, मुदतपूर्ती झाल्यावर त्यांना १० लाख विमा रक्कम आणि १०.४० लाखांचा बोनस मिळेल. म्हणजेच, २० वर्षांनंतर त्यांना एकूण २०.४० लाख रुपये मिळतील!
या पॉलिसीमध्ये मृत्यू लाभ देखील समाविष्ट आहे. जर पॉलिसी खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी (उदा. ५ वर्षांनी) एका जोडीदाराचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या जोडीदाराला १० लाख विमा रक्कम आणि त्यासोबत ५ वर्षांसाठी जमा झालेला बोनस (सुमारे २.६० लाख रुपये) मिळेल.
वाचा - PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
या योजनेमुळे जोडप्यांना एकाच पॉलिसीमध्ये आर्थिक सुरक्षा आणि भविष्यासाठी एक मजबूत कवच मिळतं. ही योजना दीर्घकाळ एकत्र राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.