Join us

३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:42 IST

Bengaluru Techie Viral Post : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा पगार नेहमीच चर्चेत येत असतो. मात्र, याची दुसरी बाजू बंगळुरुच्या एका घटनेने समोर आली आहे.

Bengaluru Techie Viral Post : बंगळूरुच्या एका हाय-सॅलरी अभियंत्याची नोकरी गेल्याची हृदयद्रावक कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका X (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने केलेल्या पोस्टनुसार, एका अभियंत्याला ४३.५ लाख रुपये वार्षिक पगारावर काम करत असताना अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामुळे तो नैराश्यात गेला आहे. विशेष म्हणजे, या अभियंत्याने आतापर्यंत  ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कर भरला होता, तरीही संकटाच्या वेळी त्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, अशी खंत या पोस्टमधून व्यक्त करण्यात आली आहे.

सलीम'ची व्यथा: टॉपर ते बेरोजगार@venkat_fin9 नावाच्या X वापरकर्त्याने 'सलीम' नावाच्या एका मित्राची गोष्ट शेअर केली आहे. सलीम हा त्याच्या NIT कॉलेजचा टॉपर होता आणि बंगळूरुमध्ये एका मोठ्या कंपनीत काम करत होता. गेल्या महिन्यात त्याला अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले. कंपनीने त्याला फक्त तीन महिन्यांचा 'सेव्हरन्स' (नोकरी सोडल्यावर मिळणारी रक्कम) दिला.

व्यंकटेश अल्ला लिहितात की, सलीमने गेल्या वर्षीच ११.२२ लाख रुपये कर भरला होता आणि गेल्या ५ वर्षांत ३० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकारला दिली आहे. पण, नोकरी गमावल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्याला कोणतीही सामाजिक किंवा नोकरीची सुरक्षा नाही.

सध्या तो बेरोजगार आहे आणि त्याला खूप असहाय्य वाटत आहे. सुदैवाने त्याच्यावर गृहकर्ज नाही. मात्र, तो त्याच्या बचतीचा आणि मिळालेल्या सेव्हरन्स फंडाचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी करत आहे. तो एका मुलाच्या शिक्षणासाठी वर्षाला १.९५ लाख रुपये खर्च करत आहे.

सरकार आणि करदात्यांवर प्रश्नचिन्हया पोस्टमध्ये व्यंकटेश यांनी म्हटले आहे की, "ज्या सरकारने लाखो रुपये कर घेतला, त्याच सरकारने त्याला सर्वात जास्त गरज असताना एकटे सोडले." ही पोस्ट वाचून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • एका वापरकर्त्याने म्हटले, "जगात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे."
  • दुसऱ्या एका वापरकर्त्याने सरकारचा बचाव करत म्हटले, "सरकार शाळा आणि इतर सुविधाही चालवते."
  • एका युजरने नोकरी गेलेल्या व्यक्तीला दिलासा मिळावा यासाठी एक उपाय सुचवला, "माझ्या मते, नोकरीवरून काढून टाकलेल्या व्यक्तीला मागील वर्षाचा आयकर परत करण्याची तरतूद असावी."
  • तर दुसऱ्या युजरने लिहिले, "हे आता नवीन 'स्टँडर्ड' बनत आहे. फक्त सरकारला दोष देऊन किंवा करांबद्दल तक्रार करून काही फायदा होणार नाही, लोकांना हे जितक्या लवकर समजेल तितके चांगले!"

वाचा - ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

ही पोस्ट आतापर्यंत ८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे आणि त्यावर हजारो कमेंट्स आल्या आहेत. या घटनेने देशातील उच्च करदात्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेवर आणि सरकारच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

टॅग्स :माहिती तंत्रज्ञानइन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादा