Join us

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:27 IST

Javed Habib : हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात क्रिप्टो घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Javed Habib : काही वर्षांपूर्वी नवरात्रीत वादग्रस्त जाहिरात छापल्याप्रकरणी वादात सापडलेले हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी प्रकरण जरा वेगळं आहे. तुम्ही जर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तरही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. देशभरात आणखी एका मोठ्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे, ज्यात प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि त्यांचा मुलगा अनस हबीब यांचे नाव समोर आले आहे.

पीडितांनी केलेल्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी जावेद आणि अनस यांच्यासह इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. संभल जिल्ह्यात नोंदवलेल्या तक्रारींनुसार, या घोटाळ्यात १५० हून अधिक लोकांनी लाखो रुपये गमावले आहेत.

७५% परताव्याचे दिले होते आमिषमीडिया रिपोर्ट्सनुसार, संभलचे पोलीस अधीक्षक (एसपी) कृष्ण कुमार बिश्नोई यांच्या माहितीनुसार, ही कथित फसवणूक फॉलिकल ग्लोबल कंपनी या नावाने करण्यात आली. सन २०२३ मध्ये, आरोपींनी एका बँक्वेट हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात १०० हून अधिक लोकांना बोलावले होते.

या कार्यक्रमादरम्यान, उपस्थित लोकांना वर्षभरात ५०% ते ७५% पर्यंत उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन बायनान्स कॉईन आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले गेले. गुंतवणूक करण्यासाठी लोकांना मोठी रक्कम जमा करण्यास सांगितले गेले.

गुंतवणूक झाल्यावर कंपनी झाली बंदगुंतवणूक करून घेतल्यानंतर, कंपनीने आपले कामकाज पूर्णपणे बंद केले आणि आरोपी फरार झाले. पीडितांनी केलेल्या तक्रारींनुसार, जमा झालेला निधीचा एक मोठा भाग सैफुल नावाच्या व्यक्तीच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आला. सैफुल याने स्वतःला एफएलसी कंपनीचा संचालक म्हणून ओळख करून दिली होती.

गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सी आणि आर्थिक व्यापारात अवास्तव नफ्याचे आमिष दाखवण्यात आले होते, याला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. या तक्रारींनंतर जावेद हबीब, अनस हबीब, सैफुल आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

वाचा - 'हा' फोन कॉल तुम्हालाही येऊ शकतो! राज्यसभा खासदार सुधा मूर्तींसोबत काय घडले, नक्की जाणून घ्या

जावेद हबीब यांचे अद्याप निवेदन नाहीभारतातील सर्वात मोठ्या हेअर आणि ब्युटी सलून चेनपैकी एक असलेल्या जावेद हबीब यांनी अद्याप या गंभीर आरोपांवर कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीसह अनेक गंभीर कलमे लावली असून, आरोपींना पकडण्यासाठी आणि फसवणूक झालेल्या रकमेच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी अशा अवास्तव परताव्याच्या आश्वासनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीधोकेबाजीपैसागुन्हेगारी