SME Credit Cards: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत आपल्या कार्यकाळात अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत ज्या अंतर्गत लोकांना व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं. त्याच वेळी, काही योजना अशा आहेत ज्या अंतर्गत क्रेडिट कार्डही दिलं जात आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) देखील अशी योजना आहे.
किती आहे मर्यादा?
खरं तर, फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेसह क्रेडिट कार्ड सुरू केले जातील. पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील. भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
एसएमई क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये
हे क्रेडिट कार्ड व्यवसायांना त्यांचं दैनंदिन कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी पैसे प्रदान करतात. उदाहरणार्थ, इक्विपमेंट्स, वस्तू खरेदी करणं आणि इतर संबंधित व्यवसाय खर्च पूर्ण करण्यासाठी ते उपयुक्त आहे. हे कार्ड व्यवसाय खर्चाचा मागोवा ठेवण्यास देखील मदत करतात. अशा प्रकारे, खर्चाचं निरीक्षण आणि नियमन सोपं होतं.
मिळतात अनेक सुविधा
अनेक एसएमई क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स, कॅशबॅक आणि इतर सुविधा देतात. यापैकी काही कार्ड टर्म लोन, परतफेडीवर सवलत यासारख्या सुविधा देतात. बिझनेस क्रेडिट कार्डचा जबाबदारीनं वापर केल्यानं एसएमईंना मजबूत क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यास मदत होऊ शकते. या अंतर्गत, काही क्रेडिट कार्ड ४५-५० दिवसांपर्यंत व्याजमुक्त कालावधी देतात, ज्यामुळे व्यवसायांना अल्पावधीत वर्किंग कॅपिटल मिळतं. यापैकी काही कार्ड स्पर्धात्मक व्याजदरांवर ईएमआय सेवा देखील देतात.