Join us

आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, उर्वरित राज्यात उघडीप कायम

By मुक्ता सरदेशमुख | Updated: September 13, 2023 20:42 IST

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या स्थितीमुळे विदर्भात पावसाला पोषक स्थिती

मागील दोन दिवस राज्यातील पावसाने उघडीप दिल्यानंतर आज विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या स्थितीमुळे विदर्भात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात राज्यभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात राज्यभर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर (३४.०) आणि जेऊरमध्ये (३४.५) आज उर्वरित जिल्ह्यांतील तापमानाच्या तुलनेत सर्वोच्च तापमानाची नोंद झाली.

संबंधित वृत्त:  राज्यात या आठवड्यात मुसळधार; वाचा कुठल्या जिल्ह्यात कसा कोसळणार?

बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे. दक्षिणेकडे झुकलेल्या या कमी दाबक्षेत्रामुळे पूर्व विदर्भ, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

अकोला अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांना आज पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यालाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामानविदर्भ