Join us

Monsoon 2024 यंदा मान्सून कधी येणार? सरी जोरदार बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:24 AM

यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साधारणतः जून ते सप्टेंबर यादरम्यान चांगला पाऊस होईल.

पुणे : यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साधारणतः जून ते सप्टेंबर यादरम्यान चांगला पाऊस होईल असा अंदाज 'साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरम'तर्फे (सॅस्कॉफ) वर्तविण्यात आला आहे.

दक्षिण आशियाच्या अतिउत्तरेकडील भागात, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु, यंदा मात्र चांगल्या पावसाचा अंदाज आहे. म्हणून ही आनंदाची वार्ता ठरली आहे.

दक्षिण आशियायी देशांच्या फोरमची बैठक नुकतीच पुण्यात झाली. त्यामध्ये भारतासह, अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा सहभाग होता.

तर जागतिक हवामान संघटना आणि इतरही आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. सध्या विषवृत्तीय प्रशांत महासागरात 'एल-निनो'ची स्थिती आहे.

पण यंदा मॉन्सून हंगामाच्या वेळी 'एल-निनो' पूर्णपणे निवळून जाईल आणि समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य स्थितीत येईल. तर मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात 'ला-निना'ची स्थिती सक्रिय होणार आहे. 'एल-निनो' आणि 'ला-निना' स्थितीचा दक्षिण आशियातील मॉन्सूनवर प्रभाव पडत असतो. यंदा ला-निनामुळे चांगला पाऊस येईल.

महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता !'सॅस्कॉफ'ने मॉन्सून पावसाचा अंदाज दिला असून, त्याचा नकाशा प्रकाशित केला आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रीय लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये यंदा पावसाचे प्रमाण सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज दिला आहे.

कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील'सॅस्कॉफच्या बैठकीमध्ये मॉन्सून हंगामातील जून ते सप्टेंबर या कालावधीतील तापमानाचा अंदाज देण्यात आला. दक्षिण आशियाच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. तर, दक्षिण आशियाचा उत्तर, उत्तर-पूर्व, पूर्व आणि दक्षिणेकडील काही भाग वगळता बहुतांश कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज देण्यात आला आहे.

अधिक वाचा: Maharashtra Weather Update; राज्यात अजून किती दिवस उष्णतेची लाट?

टॅग्स :मोसमी पाऊसहवामानपाऊसशेतीमहाराष्ट्र