Join us
Daily Top 2Weekly Top 5

Weather Updates : 'विदर्भात पावसाची शक्यता' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 23:00 IST

पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेशमध्ये सध्या थंडीची लाट जाणवत आहे. 

येणाऱ्या काही दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जेष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

५ ते ११ फेब्रुवारी(सोमवार ते रविवार) पर्यंतच्या आठवड्यात, महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेशमध्ये सध्या थंडीची लाट जाणवत आहे. 

विदर्भ - परंतु दि.९ ते १२ फेब्रुवारी(शुक्रवार ते सोमवार)पर्यंतच्या ४ दिवसात, संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम ह्या ५ जिल्ह्यात १० ते ११ फेब्रुवारीला ह्या पावसाची शक्यता अधिकच जाणवते. 

मराठवाडा- दरम्यानच्या ह्या ४ (शुक्रवार ते सोमवार ९-१२फेब्रुवारी) दिवसाच्या काळात मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात मात्र केवळ ढगाळ वातावरणच राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः ही शक्यता नांदेड हिंगोली परभणी ह्या ३ जिल्ह्यात अधिक जाणवते. 

मुंबई, कोकण व मध्य महाराष्ट्र - मुंबईसह कोकणातील ७ जिल्हे व खान्देश वगळता मध्य महाराष्ट्रातील (नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) ७ जिल्हे असे एकूण (७+७) १४ जिल्ह्यात मात्र आकाश केवळ निरभ्रच राहून, तेथे केवळ सध्या जी काही थंडी पडत आहे, तशीच थंडी जाणवणार आहे. ह्या १४ जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता जाणवत नाही. 

खान्देश- खान्देशांतील नंदुरबार, धुळे, जळगांव, अश्या ३ जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच असून तेथे मात्र ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळे त्या २-३ दिवसात तेथील थंडीवर परिणाम होऊन, थंडी काहीशी कमी जाणवेल. 

कोणत्या वातावरणीय परिणामातून ह्या पावसाची शक्यता आहे?सध्या उत्तर-अर्धभारतात अगोदरच मार्गस्थ होऊन गेलेल्या पश्चिमी झंजावातातून तेथे पाऊस, बर्फबारी व काही ठिकाणी गारपीट झाली आहे व होत आहे. तेथील अश्या ओलसर वातावरणातून तेथे जोरदार थंडीची नोंद गेल्या दिवसात आपण पाहिली आहे.                नवीन पश्चिम झंजावाताही तेथे येण्याच्या तयारीत आहे. तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटी पासून दहा ते बारा किमी उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २७० ते ३०० किमी वेगाने प्रवाही झोताचे पश्चिमी वारे अजुनही वाहत आहे. त्यामुळे एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजूनही कायम आहे. त्यातच उत्तरी थंड वारे, दक्षिण अर्ध-भारतात सध्या लोटले जात आहेत, म्हणून तर सध्या मध्य भारतात येथे आपण मध्यम थंडीचा अनुभव घेत आहोत. परंतु ह्याच दरम्यान, मध्य भारतात थंडीबरोबर, विदर्भालगतच्या छत्तीसगड व ओरिसा राज्यादरम्यान, हवेचे उच्च दाब क्षेत्रही तयार झालेले आहे. त्यामुळे घड्याळ काटा फिरतो त्या दिशेप्रमाणे हवेच्या उच्चदाब क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून बाहेर फेकल्याप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे(अँटीसायक्लोनिक विंड) क्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार वहन होत असते.                       ह्या (क्लॉकवाईज) वाऱ्यांचा वर्तुळाचा परिघ एवढा विस्तारतो की, अति बाहेरील क्षेत्र परिघातील हे वारे बंगालच्या उपसागरातही प्रवेशतात आणि बंगालच्या उपसागराततून ही वारे रहाटगाडगे पद्धतीने पाणी उचलावे तशी प्रचंड आर्द्रता उचलून विदर्भ व परिसरात ओतणार आहे. आता ओतलेल्या ह्या आर्द्रतेचा, उत्तर भारतातून आपल्याकडे सध्या लोटल्या जात असलेल्या उत्तरी थंड वाऱ्यांशी संगम व सरमिसळता होऊन, विदर्भात २-३ दिवस गडगडाटीसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि येथे हेही लक्षात असु द्या की, ही सुद्धा एक अस्वस्थ वातावरणाची (इनस्टेबल) अवस्था आहे की ज्यामुळे गारपीट घडून येत असते. अर्थात सध्या महाराष्ट्रात गारपीटीचे वातावरण नाही.

- माणिकराव खुळे  Meteorologist (Retd) IMD Pune. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान