Join us

विदर्भ, खानदेशात मोठी धरणे ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 11:12 AM

जळगाव जिल्ह्यातील हतनूर तर विदर्भातील गोसीखुर्द, तोतलाडोह, नवेगाव खैरी ही धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पूर्व विदर्भ आणि खान्देशात पावसाचा जोर वाढला असून नद्यांना पूर आला आहे. धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर तर विदर्भातील गोसीखुर्द, तोतलाडोह, नवेगाव खैरी ही धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

विदर्भातील प्रकल्प ओव्हर फ्लो- नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण ओव्हर फ्लो झाले असून, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्यम व लघु प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत.- भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिसरातील ग्रामस्थांना स्थलांतरित केले जात आहे. गडचिरोलीतही पाऊस असून, गोसीखुर्दमधून विसर्ग सुरु आहे, गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी असून संजय सरोवरचे चार दरवाजे उघडले. अमरावतीमधील तीन तालुक्यांत अतिवृष्टी असून अपर वर्धा १०० टक्के भरले आहे.

हतनूरमधून विसर्गजळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाला आहे. रात्रीपासून धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. नंदूरबार, धुळे जिल्ह्यातही संततधार पावसाचा जोर असून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :धरणपाऊसविदर्भमराठवाडा