मागील आठवड्यात झालेल्या उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ठरल्याप्रमाणे शनिवारी उजनी धरणातून पहिल्या आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात आले. हे पाणी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कॅनॉलद्वारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी शिवारात पोहोचले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वास्तविक या योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सद्यःस्थितीत सोडलेल्या कॅनॉलच्या पाण्याद्वारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२०० हेक्टरवरील पिकांना थेट फायदा होणार आहे. मागील वर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे अनेक गाव शिवारातील तलाव व विविध जलस्रोत हे पूर्णतः भर हिवाळ्यातच आटलेले आहेत.
त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती मागील आठवड्यात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली होती. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनीही तत्काळ या प्रकरणी दखल घेऊन उजनीतून पाणी सोडण्याविषयी आदेश दिले होते.
त्यानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांना पाणी पोहोचल्यानंतर दर्गनहळ्ळीतील दुसऱ्या कालव्याद्वारे लागलीच बोरी नदीतून कुरनूर धरणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली.
सद्यःस्थितीत दोन पंप कार्यान्वित करण्यात आले असून प्रत्येक पंपातून १.२२ क्युसेक प्रतिसेकंद म्हणजेच १२२० लिटर प्रतिसेकंद दराने पाणीप्रवाह सुरू आहे.
उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत
ठरल्याप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे. सद्यः स्थितीत हे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतशिवारात कॅनॉलद्वारे सुरू आहे. यानंतर हेच पाणी कुरनूर धरणात सोडण्यात येणार आहे. लवकरच कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन अक्कलकोट तालुक्याच्या दक्षिण व उत्तर भागातील शेतकरी व नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी व खालील आठही बंधारे भरून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - सचिन कल्याणशेट्टी, आमदार.