Join us

दोन दिवस पावसाचे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 09:28 IST

कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी (दि.१५) व रविवारी (दि.१६) विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ...

कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी (दि.१५) व रविवारी (दि.१६) विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तिथे 'येलो अलर्ट' आहे. तसेच पूर्व विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. घाट भागामध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात मान्सून जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोहोचलेला आहे. मान्सूनने बुधवारी राज्यातील काही भागात प्रगती केली होती; पण दोन दिवसांमध्ये मान्सूनचा मुक्काम एकाच जागेवर आहे. तो पुढे सरकलेला नाही. परंतु, दोन दिवसांत त्याला पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

येत्या १७ व १८ जून रोजी कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा भागातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट दिला आहे. सध्या मॉन्सूनची वाटचाल अतिशय मंदावलेली आहे. तर बंगालच्या उपसागरावरून मान्सूनचे जे प्रवाह येत आहेत, त्यांच्यामध्ये ऊर्जा नाही. त्यामुळे मान्सूनचा जोरदार पाऊस होत नाही.

पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मान्सून देशाच्या आणखी काही भागात दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मान्सूनने मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापलेले आहे. सध्या मान्सूनची सीमा ही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर आणि विजयानगरम या भागातच आहे.

पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. १८ जूनपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होऊन अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यांतही ह्या आठवड्यादरम्यान म्हणजे गुरुवार दि २० जूनपर्यंत मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी, मध्यम तर उर्वरित ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.- माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ, पुणेकोणत्या भागात किती झाला पाऊस?

महाबळेश्वर- ६ मिमी

कोल्हापूर-१२ मिमी

नाशिक- ०.९ मिमी

सांगली- २४ मिमी

अलिबाग- ०.६ मिमी

रत्नागिरी- १७ मिमी

परभणी- ५ मिमी

अकोला- ५ मिमी

अमरावती- ०.१ मिमी

नागपूर- ३ मिमी

यवतमाळ- २३ मिमी

टॅग्स :हवामानमोसमी पाऊसपाऊसमोसमी पावसाचा अंदाज