Join us

नारळी पौर्णिमेपासून यंदाच्या मासेमारीला सुरुवात; नौका समुद्रामध्ये रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 16:07 IST

गतवर्षी मासेमारी हंगाम हा देवगड तालुक्यामध्ये सर्वसाधारण राहिला. त्यामुळे यावर्षी नव्या आशेने नारळी पौर्णिमेच्या दिवसापासून अनेक मच्छिमारांनी आपल्या नौका समुद्रामध्ये मच्छिमारीसाठी रवाना केल्या आहेत. शासनाच्या अनेक योजना मच्छिमारांना मिळत असल्यामुळे मच्छिमार व्यावसायिकांमध्ये आशेचे किरण आहे.

अयोध्याप्रसाद गावकर, देवगड

गतवर्षी मासेमारी हंगाम हा देवगड तालुक्यामध्ये सर्वसाधारण राहिला. त्यामुळे यावर्षी नव्या आशेने नारळी पौर्णिमेच्या दिवसापासून अनेक मच्छिमारांनी आपल्या नौका समुद्रामध्ये मच्छिमारीसाठी रवाना केल्या आहेत. शासनाच्या अनेक योजना मच्छिमारांना मिळत असल्यामुळे मच्छिमार व्यावसायिकांमध्ये आशेचे किरण आहे.

१ जून ते ३१ जुलै या कालावधीमध्ये मच्छिमारी व्यवसाय पूर्णपणे बंद असतो. यावर्षी देवगड बंदरामध्ये काही मच्छिमार व्यावसायिकांनी १ ऑगस्टपासून मच्छिमारी व्यवसाय सुरु केला आहे. तर बहुतांश मच्छिमारांनी ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा दिवशी देवगड समुद्रामध्ये पूजाविधी करुन समुद्रामध्ये नारळ अर्पण करुन मच्छिमारीसाठी सुरुवात केली आहे.

मच्छिमार बांधवांसाठी अनेक सवलतीच्या योजना मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी अंमलात आणल्यामुळे मच्छिमार बांधवांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जाच्या खायीत अडकेलेले मत्स्य व्यावसायिक आता आर्थिक सुबकतेकडे मासेमारी व्यवसायातून वाटचाल करताना दिसणार आहेत.

देवगड तालुक्यामध्ये सुमारे ८४२ मत्स्य परवानाधारक नौका आहेत. यापैकी बहुतांश मच्छिमार नौकाधारकांनी आपल्या नौका नारळी पौर्णिमेपासून समुद्रात मच्छिमारी करण्यासाठी समुद्रात रवाना झाल्या आहेत. यामुळे आता मच्छी खवय्येगिरींना देवगडमध्ये ताजी मासळी उपलब्ध असणार आहे.

देवगड व विजयदुर्गमध्ये मच्छिमारी केली जाते. या दोन बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी नौका आहेत. तसेच देवगड तालुक्यामधील अनेक गावांना समुद्र व खाडी किनारे लाभल्यामुळे त्या-त्या गावांमध्येही पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. यामुळे देवगड तालुक्याची

आर्थिक नाडी ही मत्स्य आंबा व पर्यटनावर अवलंबून आहे. बहुतांश मासेमारी बांधव हे देवगड तालुक्यातील स्थानिक आहेत. यामुळे मत्स्य व्यवसायावर देवगडची अर्थव्यवस्था ही बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. यावर्षी नारळी पौर्णिमेनंतर बहुतांश मच्छिमार बांधवांनी आपल्या नौका समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी खाना केल्या आहेत.

यापूर्वी देवगड तालुक्यातील मच्छिमार बांधव नारळी पौर्णिमेला सागरामध्ये नारळ अर्पण करुन खऱ्या अर्थाने मत्स्य व्यवसायाचा मुहूर्त करीत असे. मात्र पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या १५ नंतरच मासेमारी नौका समुद्रामध्ये खऱ्या अर्थाने समुद्रामध्ये मासेमारी करीत असत. मात्र यावर्षी तालुक्यातील बहुतांश मच्छिमार बांधवांनी आपल्या नौका नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी करण्यासाठी सुरुवात केली आहे. तर काही मच्छिमार बांधव ऑक्टोबर महिन्यामध्येच मासेमारी करण्यास सुरुवात करणार आहेत.

हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

टॅग्स :मच्छीमारशेती क्षेत्रसागरी महामार्गशेतीशेतकरीसिंधुदुर्ग