Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुरात गेलेली शेती लागवडी योग्य करण्यासाठी खर्चाचा आराखडा करण्याच्या सूचना

By मुक्ता सरदेशमुख | Updated: July 26, 2023 20:19 IST

राज्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती असलेल्या भागातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करून जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा ...

राज्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती असलेल्या भागातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करून जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 अनेक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक गावांना पुराने वेढले होते. ज्या ठिकाणाची जमीन खरडून गेली आहे अशा जमिनींचे देखील पंचनामे करून दुबार पेरणीची गरज असल्यास त्याचा आराखडा करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या. पुरामुळे गावात घरात, रस्त्यावर साचलेला गाळ काढण्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दिलेला 30 लक्ष रुपयांचा आगाऊ निधी वापरावा. 

नदी, नाल्यातील गाळ काढण्याचे काम करण्यासाठी कंत्राटदारांची यंत्रसामुग्री व प्रशासनाकडून डिझेलची व्यवस्था करावी. १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी. तसेच गाळ काढल्यानंतर तो पुन्हा नदी, नाल्यात जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने करण्यात याव्यात यासाठी स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करण्यात यावा इत्यादी सूचना आढावा बैठकीत करण्यात आल्या.

टॅग्स :पूरअजित पवारशेतकरीमोसमी पाऊसपाऊसपीकशेती