भारतीय हवामान विभागाने उत्तर व मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायव्य अरबी समुद्राच्या १.५ किमीवर सध्या चक्राकार वारे वाहत आहेत.वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे कोकण, मध्य व उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काल (दि ८) धुळे, नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. आज विजांचा कडकडाटसह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात मालवण आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात हलका पाऊस झाला.
संबंधित-धुळे, नंदूरबार जिल्ह्याला आज यलो अलर्ट, राज्यात कुठे कुठे पावसाची शक्यता?राज्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जोरदार अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
यलो अलर्ट कुठे?
दरम्यान, आज (दि.९) उत्तर महाराष्ट्रात धुळे तर जळगाव, नाशिक, नगर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात पावसाची शक्यता
राज्यात अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आज पुण्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी झाली असून तापमानात वाढ झाल्याचे पहायला मिळाले. काल पुणे व आजूबाजूच्या परिसरात तापमान १७ ते २० अंशांच्या दरम्यान होते.
या जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस
सातारा, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १ ते २ अंशांने वाढून पुढील दोन दिवसात पुन्हा तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पुढील तीन दिवस किमान तापमानात फारसा बदल नसून त्यानंतर २ ते ३ अंशांनी तापमान घसरेल असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले.