Join us

Nashik : अवकाळी पावसाचा तापमानावर प्रभाव, थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे

By गोकुळ पवार | Updated: November 29, 2023 21:03 IST

Nashik : अवकाळी पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे कमाल-किमान तापमानावर प्रभाव दिसू लागला आहे.

Nashik :नाशिक जिल्ह्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे कमाल-किमान तापमानावर प्रभाव दिसू लागला आहे. किमान तापमानाचा पारा काही अंशी घसरण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेच्या सुमारास नाशिककरांना गारवा जाणवू लागला आहे. अवकाळी पावसानंतर वातावरण बदलले असून त्याचा परिणाम थेट तापमानावर जाणवू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

सुरवातीचे दोन दिवस ढगाळ हवामान सर्वत्र होते. त्यानंतर राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान हवामान खात्याने बेमोसमी पावसाचा इशारा नाशिक जिल्ह्याला दिला होता. तर रविवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने जिल्ह्याला बेमोसमी पाऊस व गारपिटीने जोरदार तडाखा दिला. यामुळे अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता या अवकाळी पावसाचा हवामानावर परिणाम जाणवत आहे. शनिवारी किमान तापमान 18.9 तर कमाल 31 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. रविवारी यामध्ये कमालीची घसरण झालेली दिसून आली. किमान तापमानाचा पारा थेट 20.4 तर कमाल तापमान 28 अंश इतके नोंदविले गेले होते. 

दरम्यान सोमवारी 18.4 अंश इतके किमान तापमानाची नोंद झाली. मंगळवारी शहरात पारा 19 अंशावर स्थिरावला. 17 तारखेला आतापर्यंतचे या हंगामातील सर्वात कमी 14.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर किमान तापमान 21 अंशापर्यंत वर सरकले होते. अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीनंतर यामध्ये पुन्हा घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता पुढील काही दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र बुधवारी व गुरुवारी कुलाबा वेधशाळेकडून नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ दर्शविण्यात आला आहे. यानंतर हवामान पूर्णत: कोरडे होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पुढील तीन दिवस हवामान अंदाज कसा?                 संपूर्ण विदर्भातील 11 व खानदेशातील नंदुरबार धुळे जळगांव अश्या ३ जिल्ह्यासहित एकूण 14 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता अजुन 3 दिवस म्हणजे शुक्रवार 1 डिसेंबरपर्यंत कायम जाणवते. मुंबईसह कोकण व मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात मात्र शुक्रवार १ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे. शनिवार 2 डिसेंबर पासून वातावरण पूर्णपणे निवळेल. 

टॅग्स :हवामाननाशिकपाऊसतापमान