Join us

Monsoon Update यंदा मान्सूनने सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:29 IST

यंदा मान्सूनने नेहमीच्या तारखेच्या सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापले आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिली.

नवी दिल्ली: यंदा मान्सूनने नेहमीच्या तारखेच्या सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापले आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिली. दरवर्षी ८ जुलैपर्यंत देशभरात पसरणाऱ्या मान्सूनने यावर्षी ही कामगिरी २ जुलैलाच पार पाडली.

यावर्षी मान्सूनचे आगमन नेहमीच्या तारखेपेक्षा केरळमध्ये दोन दिवस आधी व ईशान्य भारतात सहा दिवस आधीच झाले. ३० मे रोजी या भागांमध्ये मान्सून दाखल झाला. त्याने महाराष्ट्रापर्यंत वाटचाल केली.

मात्र पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब झाला. त्यामुळे वायव्य भारतात उष्णतेची लाट उसळली.

देशात ११ जून ते २७ जून या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये नोंदवलेल्या एकूण ८७ सेंटीमीटर पावसापैकी १५ टक्के पाऊस जूनमध्ये पडतो. दरवर्षी मान्सून सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो.

८ जुलैपर्यंत सर्व देशभरात पसरतो. त्यानंतर मान्सून १७ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून परतीच्या वाटेला निघतो व ही प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झालेली असते. मात्र सलग तिसऱ्या वर्षी नियोजित वेळेपेक्षा आधीच मान्सूनने सारा देश व्यापला आहे.

२०२१ व २०२२ या दोन्ही वर्षी मान्सून २ जुलै रोजी संपूर्ण देशात पसरला होता. २०११ सालापासून आजवर किमान सातवेळा मान्सून नियोजित वेळेपेक्षा आधीच भारतभर पोहोचला होता.

टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजहवामानपाऊसकेरळ