Pune : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाचा पावसाचा अंदाज आज (दि. १४ एप्रिल) रोजी जाहीर केला आहे. यामध्ये भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
दरम्यान, दरवर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दीर्घकालीन मान्सूनच्या पावसाचा अंदाज एप्रिल महिन्यात दिला जातो. त्यानुसार यंदाचा मान्सून अंदाज दिला गेला असून त्यानुसार यंदा देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून २०२५ हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या १०५ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशाच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात सामान्य म्हणजे न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशाच्या पूर्वेकडील भाग, तामिळनाडू आणि लडाख हा भाग वगळता देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
मान्सूनच्या पावसाचा अंदाज हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मागच्या म्हणजे मान्सून २०२४ मध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडला. तर यंदाही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.