Join us

मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:41 IST

मराठवाडयात दिनांक २३ ते २९ जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नसून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही परभणी कृषी विद्यापीठाने दिला आहे.

पेरण्यांसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. दिनांक २३ जून रोजी हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात तर दिनांक २४ जून रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली, व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने कृषी हवामान सल्ला दिला आहे. दरम्यान मराठवाडयात दिनांक २३ ते २९ जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचेही कृषी विद्यापीठाने म्हटले आहे. असे असले तरीही अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नसून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, असाही सल्ला हवामान तज्ञ समितीने दिला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक २३ जून रोजी हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात तर दिनांक २४ जून रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली, व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक २५ जून ते १ जूलै  दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :मराठवाडाशेती क्षेत्रमानसून स्पेशलपाऊस