Join us

Manjara Dam : कोरड्या पडलेल्या बॅरेजेसमध्ये मांजरा प्रकल्पातून उन्हाळी पिकांना सोडले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:25 IST

Manjara Dam : उन्हाची तीव्रता वाढली असून, मांजरा धरणातील (Manjara Dam) पाणी झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी पिकांची (summer crops) एक पाळी करण्यात आली.

लातूरउन्हाची तीव्रता वाढली असून, मांजरा धरणातील  (Manjara Dam) पाणी झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी पिकांची  (summer crops) एक पाळी करण्यात आली.

डाव्या कालव्यातून ९.५४ दलघमी आणि उजव्या कालव्यातून ६.४६ दलघमी पाणी शेतीला  (summer crops) सोडण्यात आले आहे. तर नागझरीपर्यंत असलेल्या पाच बॅरेजेससाठी १६.५४ दलघमी पाणी मंगळवारी सोडण्यात आले.

लातूर जिल्ह्यासाठी मांजरा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प आहे. लातूर शहराला पिण्यासाठी आणि लातूर तालुका आणि रेणापूर तालुक्यातील सिंचनासाठी या प्रकल्पाचे पाणी मिळते. त्यामुळे हा प्रकल्प लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे.

मागील पावसाळ्यात चांगला पाऊस काळ झाल्यामुळे शंभर टक्के धरण भरले होते. आता धरणात ६३% पाणीसाठा आहे. पाणीसाठा मुबलक असल्याने मागणीनुसार उन्हाळी पिकांसाठी  (summer crops) तीन पाळ्या पाणी सोडले जाणार आहे. पहिली पाळी पूर्ण होत आहे.

उन्हाळी पिकांना फायदा...

मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून उन्हाळी पिकासाठी असलेले पहिले आवर्तन सोडण्यात आल्यामुळे पिकांना चांगला फायदा झाला आहे. दोन्हीही कालव्यांतून धनेगाव ते लातूर आणि रेणापूर तालुक्यातील अनेक गावांना या पाण्याचा फायदा होत आहे.

मांजरा ६३% प्रकल्पात

मांजरा प्रकल्प सद्यः स्थितीत १११.६६८ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. ६३% हा पाणीसाठा असल्याने यंदा चिंता नाही. गेल्यावर्षी या तारखेत फक्त ९.५१% पाणीसाठा होता.

यंदा नऊपट अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याला आणि शेतीला पाणी मिळत आहे. साठा मुबलक असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीला आणि बॅरेजेसला प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. यामुळे बॅरेजेस अंतर्गत असलेल्या लाभ क्षेत्राला फायदा होणार आहे.

उन्हाळी पिकांसाठी पहिली पाळी पूर्ण १५ दलघमी मांजरा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाणी शेतीसाठी सोडले आहे. उन्हाळी पिकांसाठी ही पहिली पाळी असून, आणखी दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. १५ ते २० दिवसांच्या फरकाने हे आवर्तन असतील, असे मांजरा प्रकल्पाच्या शाखा अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

नदीपात्रातून बॅरेजेसमध्ये पाण्याचा झाला संचय...

* टाकळगाव, वांजरखेडा, वांगदरी, कारसा पोहरेगाव आणि नागझरी या पाच बॅरेजेससाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाणी सोडण्यात आले होते.

* या पाच बॅरेजेसमध्ये मिळून १६.५४ दलघमी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे बॅरेजेस क्षेत्रातील गावांना दिलासा मिळाला आहे.

* दरम्यान, नदीपात्रातून बॅरेजेसमध्ये पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

* प्रस्तुत पाचही बॅरेजेस लातूर तालुक्यातील आहेत. त्यात पाणी सोडल्याने अनेक गावांना फायदा होईल.

हे ही वाचा सविस्तर : Dam Water Storage : जलसाठ्यात झपाट्याने घट; जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीधरणमांजरा धरणलातूरपीकपाटबंधारे प्रकल्प