Join us

Maharashtra Weather : राज्यात सगळ्यात कुल अहिल्यानगर तापमान गेले ९ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:09 IST

अहिल्यानगरचे किमान तापमान ९.७ अंशावर गेले आहे. राज्यातील हे सर्वात नीचांकी तापमान आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी रात्री कडाक्याची थंडी होती.

अहिल्यानगर : अहिल्यानगरचे किमान तापमान ९.७ अंशावर गेले आहे. राज्यातील हे सर्वात नीचांकी तापमान आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी रात्री कडाक्याची थंडी होती.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर मंगळवारी अहिल्यानगरचे तापमान ९.७ अंश इतके नोंदले गेले आहे. यंदाच्या हिवाळ्यातील मंगळवारचे तापमान सर्वात नीचांकी ठरले आहे.

दिवाळी झाली आणि थंडीला हळूहळू सुरुवात झाली. त्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीस तापमानात दररोज घट होत आहे. गेल्या आठवड्यात सरासरी १२ ते १४ अंश इतके तापमान होते.

उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा घसरत आहे. त्यामुळे राज्यात सगळीकडेच थंडीचा कडाका आहे.

दुपारी प्रखर सूर्यकिरणांमुळे तीव्रता कमी असते. सायंकाळनंतर मात्र शीतलहरींमुळे पुन्हा गारठ्याची अनुभूती येत आहे. शहरात सहाच्या सुमारास अंधार पडत असून, यानंतर थंडीचा तडाखा वाढत आहे.

थंडीच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर यासह गरम कपडे वापरत आहेत. अनेक ठिकाणी सकाळी व संध्याकाळी शेकोटी पेटल्याचे दिसत आहे. एरव्ही रात्री बारापर्यंत असणारी रस्त्यावरील वर्दळ आता रात्री नऊच्या आतच कमी होताना दिसते आहे.

थंडीत चढ-उतारहवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे पुढील काळामध्ये राज्यात अनके भागांतील तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. राज्यात हवेचा दाब निर्माण झाल्याने थंडीत चढ-उतार होत आहे. तसेच थंडी वाढेल, असाही अंदाज देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ढगाळ वातावरण असण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :हवामानतापमानअहिल्यानगरमहाराष्ट्र