Join us

Weather Stations : आता तुमच्या गावचा हवामान अंदाज गावातच कळणार, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:35 IST

Weather Stations : स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे.

नाशिक : राज्यात आता गावपातळीवर हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील ८३ ग्रामपंचायत स्तरावर लवकरच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसेच शासकीय अनुदान व योजनांसाठी ही माहिती विशेष उपयुक्त ठरणार आहे.

यापूर्वी हवामान केंद्रांची माहिती जळगाव नेऊर, अंगणगाव, सावरगाव, राजापूर, अंदरसूल, नगरसूल, पाटोदा आणि येवला शहर या आठ ठिकाणांपुरती मर्यादित होती. परिणामी संपूर्ण महसूल मंडळाचा अंदाज एका केंद्रावरून घेतला जात असल्याने अनेक वेळा अचूक परिस्थिती समजत नसे आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसायचा. आता मात्र प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र हवामान केंद्र मिळाल्याने अधिक तंतोतंत माहिती मिळेल.

अशी राहणार स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणीप्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्रासाठी साधारणपणे ५ मीटर बाय ७ मीटर (डोंगराळ भागात ५ मीटर बाय ५ मीटर) मोकळी जागा आवश्यक राहील. तापमान व आर्द्रता सेन्सर जमिनीपासून १.२५ ते २ मीटर उंचीवर, वाऱ्याचा सेन्सर जमिनीपासून तीन मीटर उंचीवर बसवला जाणार आहे.

उंच झाडे, इमारती यांसारख्या अडथळ्यांपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक राहील. यामुळे हवामानविषयक आकडेवारी अधिक अचूक व विश्वासार्ह मिळेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

व्हेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम ह शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्यामध्ये हवामान माहितीचे जाळे तयार करून अचूक हवामान अंदाज मिळविणे व लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश आहे याचा उपयोग शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरण आखणीसाठी केला जातो.- शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला 

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसमोसमी पावसाचा अंदाजशेती क्षेत्र