Join us

नाशिक जिल्ह्यातील कुठल्या धरणात किती पाणी? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 2:16 PM

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात टँकरची संख्या वाढली असून पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात टँकरची संख्या वाढली असून पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. अशातच धरणातील पाणीसाठा देखील कमी होत चालला असून मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. एकीकडे नागरिकांचा पिण्याचा प्रश्न उपस्थित होत असताना छोटे मोठे जलाशय कोरडे होण्याच्या मार्गावर असल्याने जनावरांची तहान भागवणे मुश्किल होणार आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील धरणात केवळ 39 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील सर्वच भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. छोटी मोठी धरणे जलाशये, विहिरी यांनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तहान भागवणे देखील मुश्किल झाले आहे. अशा स्थितीत इतर वापरासाठी लागणारे पाणी देखील मिळेनासे झाले आहे. अशा स्थितीत मोठ्या धरणांची स्थिती देखील गंभीर होत चालली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 प्रकल्पामध्ये केवळ 39 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हाच जलसाठा 60 टक्क्यांवर होता. त्यामुळे यंदा जलसाठा पन्नाशीच्या जवळही नसल्याचे चित्र आहे. आगामी काळात मोठ्या पाणी संकटाला तोंड द्यावे लागणार हे निश्चित असल्याचे यावरून दिसून येत आहे.

कुठल्या धरणात किती पाणी? 

दरम्यान आजच्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला असता गंगापूर धरणांत 57.30 टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणातील पाणीसाठा चिंतेत भर टाकणारा आहे. कारण मागील वर्ष या सुमारास 68.77 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यानंतर कश्यपी धरण 84 टक्के, गौतमी गोदावरी 47 टक्के, आळंदी 44 टक्के, पालखेड 15 टक्के, करंजवण 46 टक्के, ओझरखेड 43 टक्के, दारणा 41 टक्के, भावली 24 टक्के, वालदेवी 64 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 96 टक्के, चणकापूर 43 टक्के, हरणबारी 41 टक्के, गिरणा 33 टक्के, माणिकपुंज 21 टक्के असा एकूण केवळ 44 टक्के जलसाठा नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीकांदागंगापूर धरणनाशिकपाणीकपात