Join us

Water Discharged : गंगापूर, दारणा, मुकणे धरणातून उन्हाळी सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 11:46 IST

अशा स्थितीत गंगापूर, दारणा, मुकणे धरणातून उन्हाळी सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

यंदा पाऊसमान कमी असल्याने अनेक धरणांनी तळ गाठला आहे. शिवाय पिण्याची पाण्याची देखील वाणवा आहे. अशा स्थितीत गंगापूर धरणातून उन्हाळी सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पुढे गोदावरी कालव्यांच्या माध्यमातून पुढे जाणार आहे. यासाठी गंगापूर, मुकणे, दारणा आदी धरणांतून विसर्ग करण्यात आला आहे. 

यंदा सर्वच जिल्ह्यात पाणीटंचाई असल्याने त्या त्या भागातील धरणांतून आवर्तन केले जात आहे. गंगापूर धरणातून देखील आवर्तन करण्यात येत असून सोमवारी दुपारी 4 वाजता गंगापूर धरणातून 500 क्युसेक, मुकणे धरणातून 550 क्युसेक, वालदेवी धरणातून 250 क्युसेक असे 1300 क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला आहे.  तर इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून 300 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. असे एकुण 1600 क्युसेक्स पाणी नदीमार्गे दि. 8 मे 2024 पर्यंत नांदुरमध्यमेश्वर बंधार्‍यात पोहचेल.

दरम्यान गंगापूर, दारणा, मुकणे आदी धरणातून करण्यात आलेला विसर्ग आणि नांदूरमध्यमेश्वर बंधारा या दरम्यान पाणी पोहचण्यासाठी दोन दिवस लागतील. तर सध्या नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍याची पाणी पातळी डेडस्टॉकमध्ये आहे. तर 27 फुट उंची असून बंधार्‍याची उंची 33 फुट येण्यासाठी 2 दिवस लागतील. साधारण 10 मे 2024 पर्यंत बंधार्‍याची लेव्हल आल्यावर त्याच दिवशी गोदावरीचा उजवा आणि डावा हे दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. हे एकूण 25 दिवसाचे आवर्तन राहणार असून एकुण अपेक्षित पाणी वापर 3 टिएमसी आहे. या पाण्याद्वारे बारमाही ऊस, फळबागांना पाणी देण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे या हंगामातील हे शेवटचे आवर्तन असणार आहे. 

२५ दिवसांचे हंगामी आवर्तन 

सद्यस्थितीत बहुतांश तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून रब्बी हंगमातून बहुंतांश पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. तर लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटून गेले आहेत. त्यामुळे राहाता, कोपरगाव तालुक्यातील तसेच श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव परिसर या पाण्याची चातका सारखी वाट पाहात आहे. हे अवर्तन 10 मे ला सुटल्यानंतर ते 5 ते 6 जूनपर्यंत चालेल. उन्हाळा हंगाम सन 2023-24 आवर्तन क्रमांक 2 करिता प्रवरा डावा कालव्यात सकाळी 6 वाजता शेतीसाठी विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पाणी नाशिक पुल (लोणी कोल्हार रस्ता पुलाजवळ) दुपारी 2.45 वाजता पाणी पोहचले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :नाशिकपाणी टंचाईगोदावरीगंगापूर धरणशेती