शिवराज बिचेवार
नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाने हाहाकार माजवला. विशेषत: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर असल्याने धरण पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. आणि सतत वाढते पाणी यामुळे विष्णुपुरी धरण प्रशासनाला प्रचंड दडपण सहन करावे लागले. (Vishnupuri Dam Update)
अखेरीस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३७३ टीएमसी (१०,५७८ दलघमी) एवढं पाणी गोदावरीत सोडावं लागलं. (Vishnupuri Dam Update)
१९८६ साली पूर्ण झालेलं विष्णुपुरी धरण म्हणजे नांदेडकरांच्या पाण्याचं प्रमुख स्रोतस्थान. पण यंदा या धरणाने आपल्या इतिहासातील विक्रमी विसर्ग सोडण्यात आला. एवढ्या प्रमाणात सोडलेल्या पाण्याने नांदेडकरांना सव्वाशे वर्ष पुरेल इतकी पाणीपुरवठा क्षमता निर्माण झाली असती. (Vishnupuri Dam Update)
पहिल्यांदाच सर्व १७ दरवाजे उघडले
पावसाच्या तीव्रतेमुळे आणि वरच्या जायकवाडी प्रकल्पातून सुरू झालेल्या विसर्गामुळे, विष्णुपुरीत पाणी झपाट्याने वाढू लागले. परिणामी इतिहासात प्रथमच प्रशासनाला सर्व १७ दरवाजे उघडून आठवडाभर सतत विसर्ग करावा लागला.
या चार महिन्यांत सोडलेल्या १०,५७८ दलघमी पाण्याच्या तुलनेत, धरणाची एकूण साठवण क्षमता फक्त ८०.७९ दलघमी (२.८५ टीएमसी) आहे. या कालावधीत हे धरण तब्बल १३० वेळा पूर्ण भरले आणि रिकामे झाले, असे म्हणता येईल.
विष्णुपुरी धरणाची वैशिष्ट्ये
बांधकाम वर्ष: १९८६
प्रकार: माती व दगडाचं धरण
एकूण लांबी: ४,८५० मीटर
उंची: २०.५ मीटर
साठवण क्षमता: २.८५ टीएमसी (८०.७९ दलघमी)
कालव्यांची लांबी: ६५ किलोमीटर (डावा आणि उजवा मिळून)
उद्देश: सिंचन, पिण्याचे पाणी, आणि औद्योगिक वापर
या धरणामुळे दरवर्षी ८ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येते, तसेच नांदेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा मोठा भाग इथूनच पुरवला जातो.
पावसाचा रेकॉर्डब्रेक कहर
यंदा पावसाने जूनपासूनच आपली उपस्थिती दर्शवली होती. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर पावसाने हाहाकार माजवला. गोदावरी आणि तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे विष्णुपुरी प्रशासनाला वारंवार विसर्ग करावा लागला. परिणामी, मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमतेअभावी समुद्रात विलीन झाले.
नांदेडकरांची तहान विरुद्ध विसर्गाचे प्रमाण
शहराला लागणारे वार्षिक पाणी: २४–२५ दलघमी
चार महिन्यांत सोडलेलं पाणी: १० हजार ५७८ दलघमी
यावरूनच दिसून येते की, या पावसाळ्यात सोडलेल्या पाण्याने नांदेडकरांना सव्वाशे वर्षे पुरेल एवढा साठा मिळू शकला असता.
पण साठवण अपुरी
विष्णुपुरी धरणाचे श्रेय तत्कालीन गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीला जाते. मात्र, आजच्या पावसाच्या तीव्रतेला पाहता, धरणाची साठवण क्षमता अपुरी ठरत असल्याचे स्पष्ट दिसते. पाणी साठवण क्षमतेत वाढ आणि योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी टाळता येऊ शकेल.
विष्णुपुरी धरणाचा यंदाचा विसर्ग इतिहासात नोंदला जाईल, यात शंका नाही. चार महिन्यांत सव्वाशे वर्षे पुरेल एवढं पाणी सोडावे लागणे हे हवामानातील बदल, वाढती पावसाची तीव्रता आणि साठवण क्षमतेचा अभाव याचं द्योतक आहे.
आता या पार्श्वभूमीवर शासनाने नवीन जलसाठे, साठवण प्रकल्प आणि पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर नियोजन यावर भर द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.