Join us
Daily Top 2Weekly Top 5

Unseasonal Rain : उकाड्यानंतर आभाळ फुटलं; नागपूरसह विदर्भात वादळाचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:27 IST

Unseasonal Rain : दिवसभर उकाडा आणि मध्यरात्री अचानक वादळ. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. झाडांची पडझड, वीजपुरवठा खंडित आणि शेतीचे नुकसान नेमकं काय घडलं ते वाचा सविस्तर.(Unseasonal Rain)

Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर रविवारी मध्यरात्रीनंतर अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि विदर्भात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. (Unseasonal Rain)

विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली; सुदैवाने जीवितहानीची घटना घडली नाही.(Unseasonal Rain)

मध्यरात्रीनंतर अचानक बदलले वातावरण

रविवारी दिवसभर उन्हाचे चटके जाणवत होते. नागपूरचे कमाल तापमान ३४ अंश, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले गेले. इतर जिल्ह्यांतही पारा ३४ ते ३६ अंशांदरम्यान होता. 

रात्री उकाडा जाणवत असतानाच मध्यरात्रीनंतर सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पहाटे सुमारे ४ वाजता ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली.

पावसाची नोंद

नागपूर : १०.९ मि.मी.

भंडारा : १० मि.मी.

गोंदिया : २.४ मि.मी.

नागपूर जिल्ह्यात हिंगणा, बुटीबोरी, भिवापूर भागात हलक्या सरी कोसळल्या.

झाडांची पडझड, वीजपुरवठा खंडित

वादळामुळे काही भागांत झाडे उन्मळून पडली. नागपूरमधील कळमना मार्केटमध्ये धान्याचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होऊन फीडर ब्रेकडाऊन झाले. काही भागांत तात्पुरता वीजपुरवठा ठप्प झाला.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, बल्लारपूर, चिमूर, सावली, नागभीड, गोंडपिपरी व ब्रह्मपुरी तालुक्यांत अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. 

सिंदेवाही येथील आठवडी बाजारालाही फटका बसला. राजुरा आणि आसपासच्या गावांत विजांच्या कडकडाटामुळे वीजपुरवठा खंडित झाला.

तीन दिवसांचा 'येलो अलर्ट'

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आर्द्रता वाढून वारे मध्य भारताकडे वाहत आहेत. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात द्रोणिका सक्रिय झाली असून तिचा प्रभाव विदर्भावर जाणवत आहे. या दोन्ही प्रणालींच्या संयोगामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

हवामान विभागाने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच दक्षिणेकडील वर्धा आणि यवतमाळ भागासाठी पुढील २४ तासांत वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. 

पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. त्यामुळे 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काढणीस आलेल्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना सावधगिरीचा इशारा

वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहू शकतो.

जीर्ण इमारती व पत्र्याच्या छपरांपासून दूर राहावे.

विजांच्या कडकडाटावेळी उघड्या जागेत थांबू नये.

आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

विदर्भात हवामानाने अचानक पलटी मारली असून पुढील काही दिवस नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात दुहेरी हवामानाचा खेळ; 'या' भागात बदल वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Weather Havoc: Unseasonal Rain and Storms Strike Nagpur

Web Summary : Unseasonal rains lashed Vidarbha, including Nagpur, causing damage to trees and power outages. A yellow alert has been issued for the next three days, with farmers fearing crop damage. Citizens are advised to take precautions.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीविदर्भ