Join us

Weather Report : महाशिवरात्रीपर्यंत महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 18:10 IST

महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

एकीकडे उन्हाचा कडाका वाढू लागला असताना सायंकाळी थंडीही जाणवत आहे. उत्तर भारतातील पश्चिमी झंजावाताची साखळी टिकून असुन अजुनही उद्या एक पश्चिमी झंजावात प्रवेशणार आहे. त्यामुळे ८ मार्च महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता जाणवते. त्यानंतर मात्र किमान व कमाल तापमाने हळूहळू चढतीकडे झेपावतील असा हवामान अंदाज जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. 

माणिकराव खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात कमाल व किमान तापमाने ही सध्य: काळातील सरासरी तापमानापेक्षा खाली घसरल्यामुळे पहाटेचा गारवा टिकून असुन दिवसाचा ऊबदारपणाही कमी जाणवत आहे. विशेषतः जळगांव, नाशिक, मुंबई, पुणे शहरातील व लगतच्या परिसरात व जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १२-१३ ( मुंबई १९) तर दुपारचे कमाल तापमान २८-३०  डिग्री से.ग्रेड दरम्यानची असुन ती सरासरी पेक्षा २ ते ४ डिग्री से.ग्रेडने खाली आहेत. विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रात ही तापमाने सरासरी इतकी तर काही तुरळक ठिकाणी सरासरीच्या खाली जाणवत आहे.     एल- निनोच्या वर्षात व शिवाय तो अधिक तीव्रतेकडे झुकत असतांना, रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी पाण्याची झळ बसत असतांना ह्या थंडीपासून काहीसा दिलासाच मिळत आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळले असुन पावसाची वा गारपीटीची शक्यता नाही. विदर्भात अजुन तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवते. 

टॅग्स :शेतीहवामानशेतकरीटेंभू धरण