Join us

Lightning Strike : वीज कशी तयार होते अन् कोसळते, पूर्वी दरवाजात लोखंडी वस्तू का ठेवत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:10 IST

Lightning Strike : आकाशात ही वीज (Lightning Strike) कशी तयार होते, ती जमिनीवर का व कधी काेसळते, वीज पडल्यावर किंवा पडू नये यासाठी काय उपाययाेजना करायला हव्या?

- सुनील चरपेपावसाळा व वळवाचे पावसाळी हवामान (Rainy Season) तयार हाेताच आकाशातील ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटांसह भीतीयुक्त लख्ख प्रकाश, वीज जमिनीवर पडणे, त्यात प्राणहानीसाेबतच मालमत्तेचे नुकसान हाेणे याचे प्रमाण वाढत असून, या बाबी सामान्य हाेत चालल्या आहेत. आकाशात चमकणारी वीज लाखो मेगावॅट क्षतमेची असावी, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आकाशात ही वीज (Lightning Strike) कशी तयार होते, ती जमिनीवर का व कधी काेसळते, वीज पडल्यावर किंवा पडू नये यासाठी काय उपाययाेजना करायला हव्या?

वीज कशी तयार होते?सन १८७२ मध्ये बेंजामिन फ्रँकलिन (Benjamin Franklin) या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा वीज चमकण्याचे व पडण्याचे नेमके कारण सांगितले. पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीजवळची उन्हाळ्यात तापलेली गरम हवा धुळीचे कण घेऊन आकाशात वर वर जाते. वरच्या थंड वातावरणामुळे ती हवा थंड हाेत जाते. या प्रक्रियेत हवेत छाेटे छाेटे बर्फाचे कण तयार हाेतात. बर्फाचे कण हवेत तरंगताना एकमेकांवर आदळतात. 

ते एकमेकांना घासले गेल्याने त्यांच्यात इलेक्ट्रिक चार्ज डिफरन्स तयार होतो. अधिक धनभार ढगांच्या वरच्या आणि ऋणभार ढगांच्या खालच्या बाजूला स्थिरावतो. हे धन व ऋण भारित ढग जमिनीवरून वाहताना झाडे व उंच इमारतीत धनभार तयार होतो. या भारांचा फरक वाढत जातो, तसा तसा ढग व जमीन यांच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागतो.

विद्युत प्रवाह त्याच्या वाहण्यासाठी नेहमी जवळचा मार्ग शोधतो. जेव्हा तो आपला मार्ग पूर्ण करतो, तेव्हा ही एनर्जी प्रकाशाच्या रूपात मुक्त होते व आपल्याला वीज कडाडताना दिसते. प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्याने पहिल्यांदा विजेचा लखलखाट दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो.विजेपासून स्वत:च्या बचावासाठी काय करावे?जेव्हा ढगांमध्ये पुरेसा विद्युत भार जमा होतो, तेव्हा तो हवेतून जमिनीकडे प्रवाहित होतो. या प्रवासालाच वीज पडणे म्हणतात. या विजेच्या तावडीत सापडल्याने माणसांसह प्राण्यांचा मृत्यू हाेणे, हाेरपळल्याने जखमी हाेते. हार्ट अटॅक येणे, झाडे काेलमडून पडणे किंवा जळणे, इमारती काेसळणे किंवा तडा जाणे, जमिनीवर माेठा खड्डा तयार हाेणे असे प्रकार घडतात. 

या विजेपासून स्वत:च्या रक्षणासाठी आकाशात काळेकुट्ट ढग दाटीवाटीने दिसल्यास व पाऊस सुरू झाल्यास स्वतःला सुरक्षित करण्यासाठी घरांत किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब आश्रय घ्या. गुरांचा उघडा गोठा किंवा शेडमध्ये तसेच झाडांखाली आश्रय घेऊ नका. घरातील गॅस असलेले इलेक्ट्रिकचे उपकरण हाताळू अथवा वापरू नका. नळाचे काम करू नका. 

दारे व खिडक्यांपासून दूर रहा. विजेपासून वाहणारा प्रवाह तारा, केबल व पाइपमधून वाहून तुमच्या शरीराला इजा, नुकसान पोहोचवू शकतो. हातात छत्री असेल तर ती बंद करून दूर टाकून द्या. मोकळ्या मैदानात झाडांपासून दूर उभे राहा. लाेखंड व तांब्याकडे वीज आकर्षित हाेत असल्याने या धातूंच्या वस्तू जवळ असल्यास त्या दूर फेकून द्या. 

जुन्याकाळी लाेकं ही वीज दुसरीकडे आकर्षित हाेऊन घरांवर पडू नये, यासाठी विजा कडाडताना लोखंडाचा चमचा, पळी किंवा पावशी परसबागेत फेकून देत असत. वीज चमकताना तलाव, नदी किंवा समुद्रातून ताबडतोब बाहेर जमिनीवर यावे. बंद चारचाकी वाहनांमध्ये आश्रय घ्यावा. आकाशात विजांचा गडगडाट होत असताना घरातील टीव्ही, फ्रीजसह इतर विजेची उपकरणे बंद करून त्यांचे प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. एरियल काढून ठेवा....वीज निवारक ‘लायटनिंग अरेस्टर’विजेपासून रक्षण करण्यासाठी अलीकडे मोठ्या इमारतींवर लायटनिंग अरेस्टर लावले जाते. ते एक टोकदार तांब्याची सळई व तिच्या वरच्या बाजूला त्रिशूळासारका आकार केलेला असतो, तो लावतात. त्याला तांब्याची पट्टी जोडून ती खाली आणून जमिनीत गाडतात म्हणजेच अर्थिंग करतात. वरून दोन वेगवेगळ्या तांब्याच्या किंवा ॲल्यूमिनियमच्या पट्ट्या आणून खाली जमिनीत त्याचे वेगळे वेगळे आर्थिंग केल्यास उत्तम. 

कारण विजेपासून निर्माण होणारा वीजप्रवाह हा मेगाॲम्पियरमधे असतो. दोन वेगळ्या पण एकाच धातूच्या पट्ट्या दोन ठिकाणी अर्थिंग केलेल्या असल्यामुळे प्रवाह दुभागून वाहतो. त्यामुळे त्याची तीव्रता कमी होते व तो लगेच जमिनीत शोषला जातो. लायटनिंग अरेस्टरचा वरील भाग टोकदार असतो. कारण टोकदार भागाकडे आकाशात निर्माण होणारी वीज ओढली जाते व लगेच जमिनीत शोषली जाते.

लायटनिंग अरेस्टरचे अर्थिंग कसे करावे?अर्थिंगला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु, दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते. जमिनीमध्ये साधारणतः पाच फूट खड्डा खाेदून त्यामध्ये एक फुटाची एक बाय एक इंच जाडीची तांब्याची, ॲल्युमिनियमची किंवा सॉफ्ट आयर्नची प्लेट पुरतात. त्या प्लेटच्या सभोवताली कोळसा, मीठ व रेतीचे मिश्रण पुरतात. या क्रियेला अर्थिंग असे म्हणतात. 

अर्थिंग केलेल्या ठिकाणी व आसपास ओलावा राहील, याची खबरदारी घेतली जाते. वरून आलेल्या तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या पट्ट्या या तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या प्लेटला जोडतात. दोन एकाच धातूच्या पट्ट्या एकाच धातूच्या प्लेटला वेगवेगळ्या ठिकाणी जोडतात. त्यामुळे विजेचा हेवी करंट दुभागून लगेच अर्थ पट्टीमार्गे जमिनीत वाहून निकामी होतो. त्यामुळे इमारतीचे नुकसान, मनुष्यहानी टाळता येते.

टॅग्स :हवामान अंदाजशेती क्षेत्रपाऊसमोसमी पाऊस