नाशिक : मे महिना उजाडल्यापासून पुन्हा एकदा उष्णता जाणवत असून त्याच परिणाम जिल्ह्यातील पाणीसाठ्यावर होत आहे. पाण्याची वेगाने वाफ होत असल्यामुळे धरणांची पाणीपातळी खालावली आहे. मागील चार दिवसांत एकूण अडीच टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला. २६ पाणीप्रकल्पांपैकी बहुसंख्य लहान-मोठ्या प्रकल्पांमधील साठा चाळिशीच्या आत आला आहे.
उन्हाची तीव्रता वेगाने वाढू लागताच बाष्पीभवनाची प्रक्रियाही अतिजलद होत असल्याने जलसाठे खालावू लागले आहेत. ४ मे रोजी नाशिक जिल्ह्यात एकूण ३७.६० टक्के इतका पाणीसाठी शिल्लक होता. शनिवारी (दि. ९) हा अवघ्या ३५ टक्क्यांवर आला. यामुळे पुढील दोन आठवड्यांत पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे, कडवा, चणकापूर, गिरणा या सात मोठ्या धरणांमधील पाणीसाठाही कमालीचा खालावला आहे. यामुळे आता प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पर्यायी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८ मे रोजी केवळ आठ टक्के एकूण पाणीसाठा जास्त शिल्लक आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी हंगामात ७७२.२ मि.मी. इतका पाऊस पडला होता. २०२४ सालातील पर्जन्यमानाच्या तुलनेत हे पर्जन्यमान जवळपास तीनशे मिलिमीटरने कमी राहिले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऊन तापले होते. सलग कमाल तापमान ३६ ते ४० अंशांच्या जवळपास स्थिरावत होते.
मोठे जलाशय ४० टक्क्यांच्या आत
गंगापूर धरणाचा पाणीसाठा ४७.३७टक्क्यांवर टिकून आहे. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ दोन टक्क्यांनी हा साठा जास्त आहे. उर्वरित दारणामध्ये ३१, तर करंजवणमध्ये ३२, मुकणेत ३४ आणि चणकापूरमध्ये ४२, गिरणामध्ये ४२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
शहराला दररोज लागते २१ दशलक्ष घनफूट पाणी
नाशिक शहराला दररोज २१ दशलक्ष घनफूट इतके पाणी लागते. गंगापूर धरणात महापालिकेचे ४,६०० द.ल.घ.फू. इतके पाणी आरक्षित आहे. त्यापैकी आता केवळ २६४६ द.ल.घ.फू. इतके पाणी उचलण्याची महापालिकेला मुभा आहे. महापालिकेला १८ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
Web Summary : Nashik's water reserves dwindle to 35% amid rising heat. Gangapur dam holds 47.37%, a slight increase from last year. Depleted reservoirs prompt concerns and necessitate effective water management strategies to avoid shortages in coming weeks.
Web Summary : नाशिक का जल भंडार गर्मी बढ़ने से 35% तक गिरा। गंगापुर बांध में 47.37% पानी है, जो पिछले साल से थोड़ा अधिक है। जलाशयों के घटने से चिंता बढ़ गई है, जल प्रबंधन की आवश्यकता है।