Join us

Marathwada Groundwater Level : अतिवृष्टीचा सकारात्मक परिणाम; मराठवाड्यात भूजलपातळीत सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:49 IST

Marathwada Groundwater Level : यंदाच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असले, तरी भूजलपातळी मात्र समाधानकारकरीत्या वाढली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत सुमारे १.७० मीटरने वाढ झाली आहे. परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ तर लातूर आणि हिंगोलीत तुलनेने कमी सुधारणा झाली आहे. (Marathwada Groundwater Level)

बापू सोळुंके

यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील भूजलपातळीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत सुमारे १.७० मीटरने वाढ झाली आहे. (Marathwada Groundwater Level)

सतत झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले, तरी भूजलसाठ्यात मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ परभणी जिल्ह्यात, तर सर्वांत कमी वाढ हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात झाली आहे. (Marathwada Groundwater Level)

अतिवृष्टीचा दुहेरी परिणाम

जून ते नोव्हेंबर या कालावधीत मराठवाड्यात अतिवृष्टीसह बेमोसमी पाऊसही झाला. ४ नोव्हेंबरपर्यंत पावसाची मालिका सुरूच होती. यामुळे अनेक ठिकाणी शेतीमालाचे नुकसान झाले, पण दुसरीकडे विहिरी व बोरवेलमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दिलासा मिळाला आहे.

भूजल सर्वेक्षणातील निष्कर्ष

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील ८७५ विहिरींची तपासणी केली. या सर्वेक्षणात अनेक जिल्ह्यांमध्ये भूजलपातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

जिल्हामागील ५ वर्षांची सरासरी भूजलपातळी (मीटर)यंदाची भूजलपातळी (मीटर)वाढ (मीटर)
छत्रपती संभाजीनगर४.२९३.०४१.२५
जालना३.५४२.५४१.०१
बीड३.०७१.७५१.३२
नांदेड२.८३१.०७१.७५
परभणी५.८०३.४११.६६
हिंगोली५.८०४.४११.४१
लातूर२.६०२.०५०.५७

परभणी जिल्ह्यात सर्वाधिक सुधारणा

भूजल सर्वेक्षणानुसार परभणी जिल्ह्याची भूजलपातळी सर्वाधिक वाढलेली असून ती १.६६ मीटरने सुधारली आहे. मागील काही वर्षांत या भागात सर्वात खालावलेली भूजल स्थिती होती, परंतु यंदाच्या मुसळधार पावसाने जलसाठ्यांना नवसंजीवनी दिली आहे.

मराठवाड्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी भूजलसाठ्यांतील वाढ ही पुढील रब्बी हंगामासाठी सकारात्मक बाब ठरू शकते. आता शासन आणि शेतकरी या दोघांकडूनही या जलसाठ्यांचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.

यंदा मराठवाड्यात कमी अवधीत दीडपट पाऊस पडल्याने भूजलपातळीत मोठी सुधारणा झाली आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे १.७० मीटरने वाढ झाली आहे.- प्रकाश शेलार, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

हे ही वाचा सविस्तर : MahaDBT Scheme : शेतीत वाढणार कार्यक्षमता; हजारो शेतकरी सज्ज आधुनिक यंत्रांसह!

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Groundwater Rises, Hingoli & Latur Lag Behind: Report

Web Summary : Marathwada's groundwater level surged due to heavy rains, exceeding the past five years' average by 1.70 meters. Parbhani saw the highest rise. Hingoli and Latur experienced the least increase, according to a recent survey.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपाणी