Marathwada Dam Storage : मराठवाड्यातील सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणांचे पाणी पातळी भरून वाहण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. त्यामुळे मांजरा, निम्न तेरणा आणि ऊर्ध्व कुंडलिका धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Marathwada Dam Storage)
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Marathwada Dam Storage)
मांजरा धरणातून मोठा विसर्ग
लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प (धनेगाव) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून गेट क्र. १, ३, ४ व ६ प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडण्यात आले.
सद्यस्थितीत ३,४९४.२८ क्युसेक (९८.९६ क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू असून, एकूण ६ दरवाजे उघडे आहेत. पाण्याची आवक कायम असल्याने विसर्ग वाढवण्याची किंवा कमी करण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
निम्न तेरणा प्रकल्पातून विसर्ग
लातूर जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणातही पाण्याची मोठी आवक होत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता दोन दरवाजे (गेट्स) १० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, नदीपात्रात ७६५ क्युसेक (२१.६६४ क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यापूर्वीपेक्षा विसर्ग कमी केल्याने नदीपात्रातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होणार आहे.
ऊर्ध्व कुंडलिका धरणातूनही पाणी सोडले
बीड जिल्ह्यातील सोन्नखोटा (वडवणी तालुका) येथील ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पातही आवक वाढल्याने गुरुवार रात्री ९ वाजता सांडव्याची २ वक्रद्वारे २० सेंटीमीटरने उघडण्यात आली. यातून १,३३८ क्युसेक (३७.८९ क्युमेक्स) इतका विसर्ग कुंडलिका नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पुढील पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
एकाच वेळी मांजरा, निम्न तेरणा आणि ऊर्ध्व कुंडलिका धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. सध्या ५,२४१.४२ क्युसेक (१४८.४४ क्युमेक्स) इतका एकत्रित विसर्ग नदीत सुरू आहे.
यामुळे नदीकाठच्या आणि पुराचा धोका असलेल्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे नदीजवळ सोडू नयेत आणि पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.