Join us

Manjara Canal: ‘मांजरा’चा उजवा कालवा फुटला! उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:31 IST

Manjara Canal : लातूरमधील मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा पुन्हा फुटला असून, हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर सवाल उपस्थित होत आहेत. वाचा सविस्तर (Manjara Canal)

लातूर : उन्हाळ्याच्या तीव्रतेने शेतकरी आधीच हवालदिल असताना मांजरा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या फुटण्याने पुन्हा एकदा पाण्याचा मोठा अपव्यय झाला. शुक्रवार पहाटे मांजरी व सामनगाव जलसेतूजवळ हा कालवा फुटला. (Manjara Canal)

कालव्यातून जवळपास ०.१५ दशलक्ष घनमीटर पाणी दिवसभर शेतांमध्ये वाहत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, पण प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Manjara Canal)

वैशाख वणव्यामुळे उसासह उन्हाळी पिके जगविणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कसरत होत आहे. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठीपाणी सोडण्यात आले आहे.  (Manjara Canal)

मात्र, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मांजरी, सामनगाव जलसेतूजवळ कालवा फुटल्याने दिवसभर पाण्याचे पाट वाहिले. परिणामी, हजारो लिटर पाणी वाया जाऊन शेतीचेही नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने नदी, कालवा परिसरात उसाची लागवड वाढली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकेही घेतली आहेत. यंदाचा उन्हाळा अधिक कडक असल्याने मांजरा प्रकल्पात भरपूर पाणीसाठा असल्याने प्रशासनाने उन्हाळ्यात पिकांसाठी तीन टप्प्यांत पाणी देण्याचे नियोजन केले. 

नियोजनानुसार प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून मार्च आणि एप्रिलमध्ये दोन आवर्तन देण्यात आले होते. तिसरे आवर्तन सध्या सुरु आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलसंपदा विभागाकडून प्रयत्न सुरु होता.

तीन वर्षांपूर्वीही तिथेच फुटला होता कालवा...

* तीन वर्षांपूर्वीही याच ठिकाणी कालवा फुटला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला होता. शुक्रवारी पहाटेही पुन्हा त्याच ठिकाणी कालवा फुटला.

* कालवा फुटल्याचे पाहून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रकल्पातून पाणी बंद केले. त्यामुळे प्रवाह थांबला असला तरी कालव्यातील पाणी दिवसभर वाहत होते.

* दिवसभरात जवळपास ०.१५ दशलक्ष घनमीटर पाणी वाहिले असावे, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

शेतकरी आक्रमक

* लातूर तालुक्यातील तांदुळवाडी, भुईसमुद्रगा शिवारात पाणी पोहोचत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने उजव्या कालव्यातून गुरुवारी रात्री शेतीसाठी पाणी सोडले. हे पाणी तांदुळवाडी, भुईसमुद्रगा शिवारापर्यंत पोहोचावे म्हणून वरील भागातील शेतीचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. तसेच अन्य गेटही बंद केले होते.

* दरम्यान, पाण्याचा प्रवाह वाढल्याने मांजरी, सामनगाव जलसेतूजवळ शुक्रवारी पहाटे कालवा फुटला. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. शिवाय, शेतीचेही नुकसान झाले.

उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यापूर्वी पाहणी केली होती. मात्र, कुठल्याही भेगा पडल्याचे दिसून आले नाही. परंतु, अचानकपणे कालवा फुटला. हे पाहून तात्काळ प्रकल्पावरून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. - आशिष चव्हाण, शाखाधिकारी, जलसंपदा विभाग.

हे ही वाचा सविस्तर :  Tapi Mega Recharge Project : तापी मेगा रिचार्ज परियोजनेवर महापंचायत; जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्रमांजरा धरणपाणीशेतकरीशेती